Wednesday, August 24, 2016

किश्या नाना

भाऊबंदकीच्या वादाला कंटाळून अखेर गावाकडची सारी शेती खंडाने देऊन किश्या नानाला अन म्हातारीला लेकाने मुंबईत आणलय. पण जन्मभर गावाकडं रानचा मोकळा वारा प्यायची सवय लागल्यानं नानाला अन म्हातारीला शहराची हवा काय मानवत नाही. सतत बंद घरात बसून बसून म्हातारीचं पाय तर आखाडल्यासारखं होतात. म्हणून म्हातारीला घेऊन नाना भांडुप स्टेशनच्या कडेनं सकाळी इकडून तिकडं चकरा मारताना दिसतो. सकाळी घमाजलेली माणसं पोटात कोंबून सी.एस.टीच्या दिशेने धडधड वाजत जाणार्या कडब्यानं खच्चून भरलेल्या बैलगाड़ीसारख्या दिसणार्या लोकलच्या गाड्या बघून इतकी सगळी माणसं वरच्या बाजूला कशाला जात असावीत? तिकडं जावून काय काम करीत असतील. या विचारात रस्त्याच्या बाजूंला असलेल्या सिमेंटच्या ठोकळ्यावर बसून बराच वेळ दोघं बोलत राहतात. पूर्वेकडच्या बाजूला रस्त्याकडेनं अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टीतल्या उघड्या नागड्या लोकांचं जगणं बघत बराच वेळ घालवतात. तेथील काळवंडून गेलेली बारकी उघडी बंब पोरं बघून, "गावाकडं दारात आलेल्या भिकार्याच्या पोरास्नी फळीवरच्या जर्मनच्या डब्यातला बुंदीचा लाडू काढून दिल्याचा म्हातारीला आठवत राहतो.” म्हातारीच्या आग्रहाखातर नाना त्या पोरास्नी हाताने खुणावुन जवळ बोलावतो पण त्यांची भाषा दोघांनाही नीटशी समजत नाही. मग त्यांच्या आईबापांचा कामधंदा जाणून घेण्याचा नानाचा केविलवाणा प्रयत्न काही तडीस जात नाही. झोपड्या बघत बघत शाळेच्या पुढच्या बाजूला सकाळी भाजीपाला विकत बसलेल्या भैय्याजवळ येऊन दोघ थांबतात. भैय्या त्यांच्याकडे बघत हसत हसत बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं हिंदी बोलणं काही म्हातारा म्हातारीच्या गळी उतरत नाही. मग नाना नुसत्या खुणा करून बोलत राहतो अन खाली वाकून पुढं मांडलेलं एक सुकलेलं वांग हातात घेऊन "कैसा दिला" असं एका दमात चाचपडत विचारत राहतो. पण शंभर रुपये प्रति किलो असलेल्या वांग्याच्या दराचं हे गणित काही दोघांनाही कळत नाही. म्हातारीचा समज तर समोर मांडलेली समदी वांगी भैय्या शंभरात देत असावा असा होऊन जातो. पण तालुक्याचा आठवडी बाजार न चुकविलेला नाना शेतातनं दहा रुपये किलोचं लेबल लावून टेम्पोत चढविलेलं वांगं शहराकडं धावताना प्रत्येक किलोमीटरला स्वताची किंमत वाढवत मुंबईत स्वताचा दर शंभर रुपये करूनच खाली उतरतं हे इथलं गणित त्याला आता काहीसं कळू लागतं...
...म्हातारी चालत चालत मध्येच कधीतरी डोकवणाऱ्या सूर्याकडे वर डोकावते पण गावाकडं जसा सकाळी पूर्वेकडून सूर्याचा लाल गोळा उगवताना दिसतो तसा इथे का दिसत नसावा या विचारात एकटीच दंग होवून जाते पण काही केल्या इथल्या दिशांचं गुपीत काही तिला समजत नाही. मध्येच काचेसाख्या चकाचक दिसणाऱ्या कपडयाच्या शोरूममध्ये म्हातारी नानाला घेवून बिचकत बिचकत आत शिरते. पण क्षणात दोघांचाही भ्रमनिरास होतो आणि इतक्या मोठ्या शहरातल्या दुकानात धोतराची एखादी तरी जोड़ी विकायला का ठेवत नसावीत या विचारात नाना गावाकडच्या धोतरानी आणि चोळीच्या खणानी भरलेल्या आठवडी बाजारातून क्षणात फेरफटका मारून येतो. पुढे कांजुर मार्गला वेढा काढून पण म्हातारीच्या मिसरीसाठी तंबाखुची पानं मिळत नाहीत तेव्हा वस्तीवरच्या छप्परात सुकत घातलेली तंबाखुची पानं एखान्दा मुंबई सेंट्रलच्या एस.टी डिपोत कामाला असलेला ड्राइव्हर - गाववाला घेवून येईल का? या विचारात थकलेल्या म्हातारी सोबत नाना पुन्हा दिवसभरासाठी पूर्वेच्या रॉकी मेंडोंसा चाळीत स्वताला बंद करुण घेतो. आणि मुलगा, सुन, नातवंडे टीवी बघण्यात दंग असताना वरच्या तालीतल्या ऊसाला खंडकऱ्यानं लागवडीची पोती विस्कटली असतील का? या विचारात भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पहात राहतो. ई.टीव्ही वर लागलेला अलका कुबलचा "दर्शन" कार्यक्रम बघताना मध्येच कुठेतरी हरवून, "श्रावणात गावाकडं माहेरातल्या देवासनी नारळ द्यायला आलेली एकुलती एक लेक आता कुणाच्या दारात थांबली असेल या विचारानं म्हातारी आतून तीळ तीळ तुटत राहते. आणि बाजूच्या भिंतीला टेकून बसलेला नाना जगुन झालेल्या आयुष्यावर विचार करत कुठेतरी दूर हरवत राहतो...No comments:

Post a Comment