Monday, August 15, 2016

माळावरची काशीबाई

गावापासून हायस्कूलच्या शाळेत रोज मी चार किलोमीटर कच्या रस्त्यानं अणवाणी पायानं चिखल तुडवत, नाहीतर फुफाटा उडवत चालत जायचो. ओढ़ा ओलांडून पुढं गेलं की सारा हिरवागार माळ लागायचा. या माळावर नेहमी खाली मुंड्या घालून गुरं ढोरं चरताना दिसायची. त्यांच्या पाठीवर बगळे नाहीतर कावळे डुलत बसलेले हमखास दिसायचे. रस्त्यावर माणसांची अशी वर्दळ आजीबात नाहीच. अश्या या हिरव्यागार माळाकडं बघत एका हातात कापड़ी पिशवीत दप्तर घेवून एखांदा विचार डोक्यात घेवून मी शाळेची वाट चालू लागायचो. तिथच माळावर रस्त्याच्या कडेला आठ दहा घरांची एक वस्ती लागायची. वस्तीच्या भोवती झाडांची बरीच गर्दी होती. तेथून जाताना बरं वाटायचं. कधी कधी त्या झाडांच्या सावलीत बसल्यावर पुढे जावूच वाटायचं नाही. रस्त्याशेजारी तिथल्याच एका खणभर घरात गाडग्या मडक्यांचा संसार करीत साठी ओलांडुन गेलेली एक बाई एकटीच राहयची. काशीबाई तिचं नाव. अंगानं एकदम मजबूत. ऊंचीनं धिप्पाड. डोक्यावर कायम लुगड्याचा पदर घेवून वावरणारी. कधी कधी डोक्यावर पाटी घेवून माळावरचं शेण गोळा करतानाही दिसायची. मला नेहमी प्रश्न पडायचा हिच्या घरी ही एकटीच कशी काय राहते. हिच्या घरापुढच्या दगड धोंडयानी रचलेल्या तुळशीच्या कट्याभोवती कधी खेळताना लहान पोर दिसलीच नाहीत. शाळेत जाताना मी एखदा वाट सोडून हिच्या खणभर घरात पाणी मागायला गेलो. तेव्हा ती म्हणाली," बापुचा नातू न्हवका तू? आरं बस की? दुष्काळात माझं घर जगविलं बघ त्येनं! पोतंभर जुंधळं घातलवतं बघ अमासनी त्या साली! लई ईमानी माणूस व्हता"
मी हो म्हणून मान डोलवली. अन मग रोजच शाळेत जाताना काशीबाईच्या घरी पाणी प्यायला मुक्काम पडू लागला. मग ती कधी पत्र्याच्या डब्यातल्या शिजलेल्या शेँगा काढून खायला द्यायची. त्या मी खिसा भरून रस्त्याने फोलपाटे फेकत खात जायचो. कधी घरा मागच्या सिताफळीची पिकलेली सिताफळे काढून द्यायची. कधी कधी तिचं दार बंद दिसलं की मी प्रचंड अस्वस्थ व्हायचो. ओढ्याच्या वरच्या बाजूला एक जमीनीचा वडलोपार्जित तुकडा होता. त्यात ती राबताना दिसायची. कधी भांगलत बसलेली दिसायची. कधी उन्हाळ्यात नांगरुण पडलेल्या ढेकळातील काश्या काढ़ताना दिसायची. तिच्या शेतात काम नसलं की इतर दिवस मजुरीनं दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. तालुक्याला आठवडी बाजारला घरातलं किडूक मिडूक विकायला घेवून दहा किलोमीटर टायराच पायताण ओढत चालत जायची. नशीबात भोगायला आलेली दुःख कधी तिच्या चेहऱ्यावर वर आलेली दिसायची नाहीत. पण तसं हे गाव तिचं न्हवतच. ती तिच्या माहेरी राहिलेली. पण हे कोड़े काही बरेच दिवस मला उलगडले नाही...
...तिला आपलं असं कोणी न्हवतच का? कुणी नात्यागोत्यातला एखांदा पाहुणा सुद्धा तिच्या घरी आलेला मी कधी पाहिलाच न्हवता. मी सोडून तिच्या घरी कधी बाया माणसांची वर्दळ दिसलीच न्हवती. गावापासून लांब राहत होती म्हणून? की विधवा होती म्हणून? कधी एखांद्याच्या लग्नकार्याचे नाहीतर इतर समारंभाचे आंत्रमण घेवून तिच्या दारात कधी कोण आलेला दिसलाच नाही? आणि कालवण भाकरी सोडून कधी गोड धोड खातानाही ती कधीच का दिसली नाही? शेकडो प्रश्न माझ्या चिमुकल्या मेंदूला भांडावुन सोडायचे. एका दुपारी मी शाळेच्या मागच्या खिडकीतून दप्पतराची पिशवी मागं फेकली आणि पुढच्या दारानं बाहेर पडून मागं टाकलेली पिशवी उचलून माळामाळानी शाळा बुडवून वस्तीजवळ आलो. काशीबाई दुरुनच पिपरणीच्या झाडाच्या सावलीत नेहमीसारखी एकटीच खाली मान घालून काहीतरी करताना दिसत होती. मी रस्ता सोडून आत वळलो ती वाकाळ शिवत बसलेली. तिनं माझ्या पावलांच्या दिशेने मान वळवून पाहिलं अन म्हणाली,"देवा का रं शाळा बुडवुस आलास! आसं चांगलं नाय शाळतनं पळून येनं? चांगला शिकलास की कुटंतरी कामधंदा तरी मिळल बाबा! नायतर जनमभर बसचिल या माळावर गुरढोरं राकित?".
" रोज रोज कोण बुडिवतय? कधीतरी येतो पळून! कंटाळा आला की?".
"कुणाला शिवतीस ग वाकाळ? तू तर एकटीच हाईस की? तुला कुठं पोरं बाळं हायती?".
"कुणी नाय बाबा मला एकटा जीव हाय माझा".
माझ्या बोलण्यावर एवढच उत्तर देवून काशीबाई कुठंतरी हरवून गेल्याचं मला जाणवलं. मी पिपरणीच्या बुडक्यात बारदाणाने गुंडाळलेल्या डेऱ्यातील थंडगार तांब्याभर पाणी डसाडसा प्यालो. काही वेळ गप्प राहिलेल्या काशीबाईचे डोळे पाण्याने भरलेले माझ्या चिमुकल्या नजरने टिपले...
...त्या दिवशी मला तिच्या तोंडून समजले की लग्न झालं अन सोळाव्यानं माहेरी आलेली काशी परत कधी सासरी गेलीच नाही. तिच्या नवऱ्याचं त्या गावातल्याच एका बाईसोबत अगोदरच सूत जमलेलं. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ती त्याचं लग्न झालेलं समजल्यावर त्याच्या घरी येवून, "माझी काय ती वाट लाव?" म्हणून घरी येवून ठाण मांडून बसली. पुढे बऱ्याच वर्षानी त्या बाईंनच त्याला कायतरी खायला घालून मारलं, एवढच तिला कुठून तरी समजलं अन इतके दिवस त्याच्या नावाने लावत आलेल कुंकू कायमच पुसून भुंड कपाळ आयुष्यभर सोबत वागवत राहिली. काळजी करुन करुन म्हातारपण याच्या आधीच आईबाप पण पोरके करुन निघुन गेले. अन काशी एकटी उरली. पण काशीबाई जगत राह्यली. हलत राहिली. धरपड़त राहिली. ना कधी कुरर्कुरली ना कधी ढासलली ना कधी मोडून पडली. छे! उभ्या आयुष्यात शाळेची पायरी न चढलेली काशीबाई जगन्याचं तत्वज्ञान कोणत्या शाळेत शिकली असावी?
...पुढे शिक्षणासाठी गावासोबतची नाळ तुटली. मेंदू जसजसा मोठा होत गेला तसा तो काशीबाईच्या आणि माझ्या जगण्यात फार मोठ अंतर सोडत गेला. कदाचित एका तपाएवढं मोठं. केवळ पैसा आणि लैंगिक वासना एवढयाच गोष्टीना सुख समजून जगणाऱ्या माणसात राहून, हे सर्व नसतानाही जगन्याचं खरं सुख अनुभवणाऱ्या काशीबाईची आठवण यायला मला वेळ होताच कुठे? कितीतरी वर्षांनंतर त्याच पिपरणीच्या वठलेल्या झाडाखाली एक म्हातारी कोंबडयांना बघुन काठी हलवताना दिसली. मी रस्त्याच्या कडेला गाड़ी थांबवून नाला चढून त्या थकलेल्या म्हाताऱ्या देहाला पाहुन हाक मारली,
"काशीबाईsss?"
होय! इतक्या वर्षांनंतरही माझा बदलेला चेहरा ओळखून हरकुन गेलेला तो जीर्ण झालेला म्हातारा देह काशीबाईचाच होता...
...बरीच विचारपुस झाल्यानंतर मी तिचा निरोप घेतला. तिने तो भरल्या डोळयांनी हात दाखवत दिलाही. मी नाला ओलांडून गाडीकडे वळलो आणि पाठीमागून पुन्हा हाक आली, "आरं हिकडं ये! एक ईचारायचं राहिलच की?" मी जवळ गेलो अन तिनं विचारलं,
"लगीन केलस का?".
तिच्या या प्रश्नाने माझ्या मेंदूची आतल्या आत घुसळण होवून एकच विचार मनात आला -
"खरच! 'तसला' दिवस तिच्या उभ्या आयुष्यात कधीच आला नसेल का???No comments:

Post a Comment