Thursday, July 28, 2016

ईरजिक



...त्यावेळी गावागावात शेतातील बरीच कामं एकत्र येवून केली जायची. त्याला ईरजिक म्हणत. जे काम करण्यासाठी जास्त माणसं लागायची. त्यासाठी ईरजिकवर अशी कामे केली जायची. यात 25-30 माणसं असायची. एका दिवसात असली काम पटकन होवून जायची.आणि ही काम करण्याच्या बदली भरपेट जेवणं मिळायची. पण मदत म्हणून ही कामं आपुलकीनं केली जायची. मग कुणाच्या डोंगराकडंच्या शेतात गवत कापायचं काम निघायचं. तर कुणाची ज्वारी उपटायची, कुणाची नांगरट करायची असायची, कुणाच्या शेतातील कापसाची सुकलेलीे खोडं उपटायचं काम निघायचं. ज्याच्या शेतात असं काम निघायचं तो आदल्या रात्रीच यात तरबेज असणाऱ्या सगळ्या माणसांच्या घरी जावूंन सांगायचा. असं कुणाच्या शेतात ईरजिक वर काम निघालं की सकाळी दिवस उगवायच्या आत बायका माणसं विळे खुरप्यासनी धारा लावून आनंदानं शेताकडं पळायची.मग जास्त गवत कापण्यासाठी चढ़ाओढ़ लागायची. त्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी आम्हा बच्चे मंडळीवर असायची. विहिरित उतरून गार पाणी पळत पळत आम्ही आणत असू. कुणाला तंबाखु लागायची मग ती मळून द्यायचे काम एखांद्या काम होणाऱ्या थकलेल्या माणसाला दिले जायचे. त्या घरातल्या म्हातारी आज्जीला गावातनं दोन वेळेला जर्मनच्या किटलीतून चहा आणून लोकानां पाजण्याची जबाबदारी दिलेली असायची. सारं शेत माणसानी फूलुन जायचे. तर तिकडे त्या शेताचा मालक बांधावरच्या शेवग्यावर चढून लांब बांबूच्या काठीने शेवग्याच्या शेँगा पाडायचा आणि सगळ्या लोकांना आपुलकिने वाटून द्यायचा. जे जे आपल्या शेतात असेल ते सर्व अपुलकिने दिले जायचे. तिकडूनही तितक्याच् प्रेमाने स्वीकार केला जायचा. दुपारी पीठलं भाकरी ताजा कांदा खायला मिळायचा. सोबत दही आणि ताक प्यायला मिळायचे. ईरजिकवर नांगरटीची कामं निघाली तर सगळ्या शेतात बैलच बैल दिसायचे. दोरखंड, शिवळा, सापत्या, वैरंण भरून बैलगाडया शेतात दिवस उगवायला पोहचलेल्या असायच्या. बारा बैलांचे नांगर पूर्वी धरले जात. शेत जेवढे फोडायला कठीण त्यावरून मग 8 बैलांचा नांगर, 12 बैलांचा नांगर धरला जायचा. या कामात तरबेज असलेल्या माणसालाच नांगर धरण्याचे काम दिले जायचे. यासाठी अंगात मोठी ताकद आणि कसब लागे. मग मधेच एखांदा बैलांची नावे घेवून गाणे गावू लागायचा. तर मधेच एखांदा धोतरवाला नाना बरोबर मधे असलेल्या 6 नंबरच्या चुकारपणा करणाऱ्या बैलांवर ढेकुळ फेकायचा. चाबकांच्या वादीचा फट फट आवाज आणि म्हटली गेलेली गाणी सारा रिकामा शिवार फुलवुन जायची. तर मागे नांगरुण टाकलेल्या काळ्या ढेकळात बगळे किड्या मुंग्याना टीपत बसायचे. मग दुपार झाली की नांगर सुठायचा. विहिरिवरचे ईजिंन हैंडल मारून भक भक भक करत चालू केले जायचे.पाटभरून पाणी वाहू लागायचे. पाटात मधेच खोल खड्डा केलेला असायचा. उन्हात सकाळपासून तापलेली बैलं पाण्यावर तुटून पड़त. इतक्यात कोणतरी मोठयाने शीळ घालायचा. बैलांना पाणी प्यायला अजुन हुरुप यायचा. मग बांधावर ओळीने असलेल्या दहा बारा आंब्याच्या भल्या मोठ्या झाडाखाली सावलीत बैल वैरण खावुन
ताणून द्यायचे. तिकडे गावात त्या घरातील बायका सकाळपासूनच बाहेर चुली मांडून भाकरी थापत.अश्या वेळी आजुबाजूच्या समद्या बायका मदत करीत. मग गावाकडून सायकलीवर मोठी बुट्टी आणि मटनाचे हांडे कैरेजला बांधून आणले जायचे. शेतातले पातीसहित कांदे उपटले जायचे.गावाबाहेरच्या आडोशाला असलेल्या खोपटातल्या गुत्त्यामधुन खास पहिल्या धारंची, स्पेशल सायकलवरुन आणलेली असायची. काही ख़ास लोकच हे घ्यायचे. आंब्याच्या सावलीत मोठी पंगत पडायची. उन्हातान्हात नांगरट करुण दमलेली माणसं मग मटनाच्या रश्यावर तटून पडायची. मधेच पितळी उचलून भुरका मारला जायचा.जोड़ीला खोपीत ओल्या बारदानात गुंडालेल्या माठातील थंड पाणी पाजन्याची जबाबदारी आम्हा बच्चे मंडळीवर दिलेली असायची. दिवस मावळला की बैलगाड्या आपापल्या घरांकडे सुसाट धावत सुटायच्या...
....आता काळ बदलला आहे. असे कोणी कोणाच्यात इरजिकवर कामाला जात नाही. प्रत्येकजन आपल्याच कामात दंग. शेकडो रूपये मजूरी देवून पण कोणी कामाला मिळत नाही. नव्या पिढ्या आता राजकीय पक्षांचे झेंडे घेवून ब्रूम ब्रूम करत विषाच्या बाटल्या पोटात भरून सुसाट गाड्या मारताना दिसतात तिथं आता कोठुन दिसणार सकाळी बैलगाड्या जुंपून शेताकडं धावणारी श्रमकरी माणसं. आणि बाहेरच्या चुलीवर गाणी गात भाकरी थापणाऱ्या बायका. आता 12 बैलांचे नांगर कायमचे सुटलेत. त्यांच्या खांद्यावरच्या शिवळा आता मोडून कुजुन गेल्यात. एकेकाळी फट फट आवाज करणारा वादीचा चाबुक मोडक्या छप्परात लपून बसलाय. बैल पण आता ठराविक जणांच्याच् दावनीला बांधलेले दिसतात. ट्रक्टरवाले एका तासात दिवसभराचे काम करुण रोख पैसे घेवून जातात. आता बैलांना उद्देशून नांगरटीत म्हंटल्या गेलेल्या गाण्यांची जागा ट्रैक्टर मध्यल्या अर्थहीन भपंक गाण्यानी कधीच घेतलीय. एकेकाळी किर्लोस्कर कंपनीने बारा बैलांसाठी बनविलेले मजबूत देहांचे नांगर आता सापळे बनून घराघरा समोरच्या आड़गळीत शेवटचे दिवस मोजत बसलेत. आणि कधी काळी दिवस उगवायला शिवारात नांगर धरणारी रापट देहांची दणकट माणसं आता गावच्या पारासमोर सकाळी थरथरत्या हातांनी काठी टेकत हताश होवून बसलेली दिसतात. डोळ्यादेखत उध्वस्त झालेल्या समोरच्या आपल्याच गावाकडं बघत....



फोटो सौजन्य: गोष्टी गावाकडच्या




No comments:

Post a Comment