Thursday, July 28, 2016

गणुबातिसऱ्या बाळंतपणात बायको मेली तसा गणुबा जास्तच दारुत बडाला. दिवस रात्र गावाबाहेरच्या मालीच्या हातभट्टीच्या गुत्यावर पडून राह्यचा.नंतर नंतर तर घरातल्या सगळ्या वस्तु गावातल्या दुकानदारांच्या घरातल्या फळीवर जावून बसल्या. उरलेला जमिनीचा तुकड़ा पण उधारीत गेला. बालपन कोमेजून दोन लहान पोरांची शाळा कायमची सुटली. गावतल्या लखुबा शेटने सोन्या चांदीच्या दुकानला शेट बनवतो म्हणून दोन्ही पोरं केरळला नेली. म्हातारी तर पार कोसळून गेली.रागाने कधीकधी मालीच्या गुत्त्यावर जावून हातपाय घासायची. पण ाही उपयोग झाला नाही. चार महिन्याच्या चिमुकलीला वस्तिवरच्या गोठ्याच्या बाहेर शेजारी पाजारी म्हशीच्या धारा काढ़ताना कपभर दूधाच्या आशेने डोळयांची वाळवंटे करुन बसू लागली. भुकेने चिमुकलीचा आक्रोश तिचं काळीज पेटवून द्यायचा. मग खपाटीला गेलेल्या तिच्या पोटावरची सुकलेली कातडी वर खाली व्हायची. सुरवातीला शेजाऱ्यानी थोड़े थोड़े शीळे पाके दिले पण "रोजचच मडं त्याला कोण रडं" करीत शेजारी पण दूर पळाले. मग गोठ्यातली वाळलेली मकेची कणसे सोलून कोपऱ्यातल्या जात्यावर भरडून म्हातारी चुलीवर रटारटा कण्या शिजवून पोटाची आग भागवू लागली. कशाची तरी पेज करुन पोरीला पाजायची. पण त्यानं तिची भूक संपायची नाही. तिचा आक्रोश रात्रीच्या एकांतात अंधार कापीत दुरपर्यन्त जायचा. गावातली परटाची शाली एका रात्री म्हातारीजवळ आली अन कानात कायतरी कुजबुजुन गेली. तवापासून तर म्हातारीचा डोळ्याला डोळा लागला नाही. एक मन म्हणायचे, 'शालीचा सल्ला घ्याला नको' तर दूसरे मन म्हणायच,' 'आपल्या मागं हिचं कोण बघणार! घरात ठीवुन पण उपाशीच मरणार...'
...सूर्याची किरणे ओढा ओलांडून वस्तीकडं आली तशी म्हातारी चिमुकलीला काखत धरून कोवळ्या उन्हाला अंगणात येवून बसली. तशी पलिकडच्या गोठ्यातली किसाबाई म्हशीच्या कासत तसच शिल्लक दूध ठेवून दूधाची किटली घेवून घरात पळाली. म्हातारीच्या डोळ्यातनं पाण्याची धार मांडीवरल्या चिमुकलीवर पडली तशी घाबरुन चिमुकली रडायला लागली. इतक्यात ओढ़ा ओलांडून एक पांढऱ्या रंगाची व्हॅन वस्तीच्या दिशेने येताना दिसली. तशी म्हातारी भीतीनं थरथर कापायला लागली. व्हॅन येवून गोट्याच्या पुढच्या वाळलेल्या तुळशी जवळ येवून थांबली अन परटाच्या शालीसोबत एक जोडपं खाली उतरलं. शाली म्हातारीला म्हणाली," त्यांच्या घरी लई शिरिमंती हाय! पण त्यासनी मुलबाळ झालं नाय! तुझ्या नातीला चांगलं संभाळत्याल !तू नगस काळजी करूस." त्यातील बाईने हातातील खेळणी दाखवत चिमुकलीला उचलून घेतली तसा म्हातारीच्या डोळ्यांचा बांध फुटला...
...गाड़ी ओढ़ा ओलांडून दूर झाडांच्या आडोशाला दिसेनासी झाली. पण पांढऱ्या गाडीतून कायमचं शहराकडे धावत जाणाऱ्या काळजाच्या चिमुकल्या तुकड्याकडं म्हातारी हात जोडून तशीच मुसमुसत बघत राहिली...

No comments:

Post a Comment