Thursday, July 28, 2016

छप्परातला दिन्या



घरात तीन बारकी पोरं. एकटयाच्या मजुरीवर त्याचा छप्परातला प्रपंच कसातरी रडत कुढत चालायचा. पावसाळ्यात हाताला काम मिळायचं नाही. मग दिन्याच्या पोटासकट बायका पोरांचं प्रचंड हाल व्हायचं. पावसाळ्यात नुसताच माडगं पिवून दिस ढकलायचा. पण जगायचा. रडायचा नाही. हलत राह्यचा. कुणी "जेवलास का रं दिना" विचारलं की मोठ्यांनं खोटाच ढेकर देवून वातावरणात जेवल्याचा आभास निर्माण करायचा. पावसाळ्यात कुणी हाक दिली की दिन्या कुणाच्या घरावरची काैलं बसवून द्यायचा. कुणाचं छप्पर शेकरायचा. कुणाच्या गोठ्याला कू बांधून द्यायचा. तर कुणाच्या घरासमोर जळनासाठी लाकडं फोडून ढीग मारायचा. कधी नुसत्या चहावर नाहीतर एकवेळच्या जेवणावर असली कामं करुण द्यायचा. कुणाच्या कामाला कधी नाही म्हणायचा नाही. नदीला पुराचं पाणी चढ़लं की सारं गाव खालच्या अंगाला असलेल्या नदीकडं सरकायचं. पण दिन्या उलटा ओढ़याकडं सरकायचा. त्याच्या मागं मी पण पळायचो. हा ओढ्याकडं गेला की बायको छप्परातल्या कोपर्यात पाटयावर मसाला वाटत बासायची. खांद्यावर एक जाळी अन हातात मोड़की छत्री घेवून ओढ्याच्या पुलावर उडणारं मासं पकडायचा. पुरात शिरून करंजीच्या झाडाचा आसरा घेवून जाळं लावायचा नदीला पूर चढला की नदीचा मासा ओढयाला चढ़ायचा. कधी कधी पुरात वाहत आलेला एखान्दा साप येवून दिन्याला धड़कायचा. पण दिन्या पृथ्वीवर असलेल्या कुठल्याच सजीव जीवाला घाबराचा नाही. सापाला हातात धरून गरगर फिरवून गढुळलेल्या पुराच्या पाण्यात अलगद फेकायचा. धोतराच्या फडक्यात पकडलेलं मासं गुंडाळून वर्षानुवर्षे अंधार बाळगून बसलेल्या त्याच्या छप्परात नेवून बायकापोरांना शिजवून घालायचा. भूक शांत झाल्यावर बाहेरच्या पावसाळी अंधारात रस्त्यावर येवून कुणी माणूस दिसलं की कधीतरी खरा ढेकर पण द्यायचा...
...गावाला आलोय. रात्रीपासून प्रचंड पावूस कोसळतोय.ओढ्याच्या काठावर एकटाच बसलोय. वेडयासारखा कालपासून दिन्याला शोधतोय. ओढ़याला प्रचंड पूर आलाय. मासा चढलाय. पण दिन्या कुठाय? खरच कुठाय दिन्या? कुठं गेला असेल? अख्या पृथ्वीवर कुठल्याच सजीव जीवाला घाबरणाऱ्या दिन्याला या ओढ्यानं का पोटात घेतला असल. दिन्या तू पट्टीचा पोहणारा होतास! मग असा कसा बुडून मेलास? छे! छे! तू मेला नाहीस दिन्या! तो बघ समोरच्या करंजीच्या झाडात जाळं टाकताना तू मला अजुन स्पष्ट दिसतोस. तो बघ! तो बघ! पलिकडून हिरवा साप वाहत येतोय. पकड़ पकड़ दिन्या चावल तुला!! घे झेप त्याच्यावर अन दे भिरकावून गरगर याच पुरातल्या पाण्यात. साऱ्या गावासाठी तू मेला असचिल. कदाचीत तुझ्या आजही गळणाऱ्या त्या छप्परातील तुझ्या बायका पोरांसानठीसुद्धा तू आता मेला असचिल. पण तू माझ्यासाठी अजुन जिवंत आहेस. तुझ्या धोतराच्या फडक्यात मासं गुंडाळून झालं की सांग मला दिना. तुझ्या हातचं मासं आज मी खाणार आहे. मी जिवंत करणार आहे आज दिन्या तुला. लोकं मला शिव्या घालताहेत रे! तुमच्या रंगवलेल्या नाटकांचा शेवट कधीतरी गोड करा म्हणून? माफ कर मला दिन्या ? तू अजुन जिवंत आहेस म्हणून खोटच सांगू का रे या आभासी जगात जगणाऱ्या फेसबुकवरील लोकांना...

फोटो सौजन्य:प्रहार

No comments:

Post a Comment