Thursday, July 28, 2016

पैसा कीड़ा



अजूनही वाटत व्हावं लहान अन जावं पावसाळी पांदीतून डोक्यावर पोतं पांघरून कचाकचा पायांनी चिखल तुडवतअन शिरावं कुणाच्या तरी आगाप पेरलेल्या भुईमुगाच्या हिरव्यागार शेतात…. तिथच बसून खाव्यात भरपेट ओल्या शेंगा आणि तृप्तीचा ढेकर देत काळ्या मातीत फेकून द्यावीत टरफले उघडीच.…
शेतातनं चालत चालत लाजुन पळणारा गुळगुळीत पैसा-कीड़ा उचलून घ्यावा हाताच्या तळव्यावर अन तसाच टाकावा कुणाच्या तरी शर्टाच्या आत.… बघावी गंमत पूर्वीसारखीच.…
तेथूनच पुढे दिसणाऱ्या हिरव्यागार माळावरच्या सूर्यफुलांनी पिवळ्य झमक भरलेल्या शेतात, भल मोठ शंखाचं ओझं घेवून आपल्याच तंद्रीत फिरणारी पकडावी परत गोगलगाई.…. तिचं हळू हळू चालणं बघुन आठवावं म्हणतोय बालपणी पहिलं पाऊल टाकताना स्वतालाच.…
शिवारातून कुणाचीही भीती बाळगता अलगद उडत जाणाऱ्या मावश्यांना चिमटीत धरून पकडाव्यात आणि द्याव्यात सोडून थंडगार वाहणा-या वाऱ्यासोबत. पळावं म्हणतोय आपणही माग थोडं. अंगावर चढलेल्या प्रतिष्ठेच्या कवचकुंडलांना दूर फेकून देत…….
गावच्या खालच्या बाजूला खळखळत वाहणाऱ्या ओढयातील चाहूल लागताच बिळात शिरणाऱ्या खेकड्यांना हात घालून पकडावे म्हणतोय रात्रीच्या सायकलच्या पेटवलेल्या जुन्या टायरच्या उजेडात. अन तिथेच काठावर वेटोळे घालून बसलेल्या पानसापांना लावावे हुस्कावून रात्रीच्या किर्रर करणाऱ्या काळोखात. वाट सापडेल तिकडे सळसळ करत पालापाचोळा तुडवताना ऐकावा त्यांचा आवाज रात्रीच्या शांत एकांतात फक्त आपल्याच काणांनी…… शिरपा तात्याच्या मळ्यातल्या आंब्यावर सरसर वर चढून् काढावा म्हणतोय नुकताच पाड लागलेला शेंडयातला पहिला पिवळा आंबा. अन उतरताना पायाची निघालीच सालटी तर लावावा म्हणतोय परत बांधावरचाच दगडी पाला.…
रात्री वस्तीवर झोपायला जाताना अंधारातून लुकलुक पळत रस्त्यात आडवे येणारे असंख्य काजवे……. त्यांना काचेच्या बाटलीत बंद करुण पुन्हा पाडावा म्हणतोय उजेड वस्तीवरच्या अंधाऱ्या छप्परात…..अन अड़गळीत पडलेली मळकट गोधडी पुन्हा पांघरून मांडावा म्हणतोय हिशोब उडून गेलेल्या कित्येक दिवस आणि रात्रींचा.….


No comments:

Post a Comment