Saturday, October 28, 2017

हरवलेल्या वाटात्या गजबजलेल्या चाळीतील दिवे आता पेटू लागले. दुपारी विझलेले संसार पुन्हा सुरु झाले. लहान मुलांचा गेंगाट सुरु झाला. घराघरातून दूरचित्र वाहिन्यांचे स्वर घुमू लागले. दुरून धावणाऱ्या लोकलचे दिवे पेटलेल्या माळेप्रमाणे पुढे सरकू लागले. कामावरून सुटलेल्या लोकांची चाळीच्या दिशेने ये जा सुरु झाली. वसंताच्या खोलीत मात्र शांतता होती. तो बेडवर निस्तेज पडून होता. भूतकाळीन आठवणीत तो गढून गेला होता.

वसंत गेल्या चार वर्षापासून या चाळीत रहात होता. सातारा जिल्ह्यातील डोंगरकाठी एका छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झालेला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. रात्र रात्र अभ्यास करून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी मिळवली. नोकरीसाठी प्रयत्न करू लागला. परुंतु आईच्या अचानक मृत्युने नोकरी आधीच त्याला आरती नावाच्या एका तरुणीशी विवाह करावा लागला. आरती मुंबईत राहिलेली. तिच्या जगण्याविषयीच्या कल्पना मॉडर्न आणि संसाराविषयीच्या कल्पना काव्यमय. एका पांढरपेशा सुविद्य, तंत्रज्ञानाने झपाटलेल्या जगातून ती खेड्यात आली होती. त्यात वसंतलाही शहरात नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे लवकरच तिला या खेड्याचा कंटाळा आला. तिथले दरिद्री जीवन, धोतर लुगड्यातले स्त्री पुरुष पाहून तिला किळस वाटे. तिने वसंताला मुंबईत आई वडिलांकडे येण्याची विनंती केली. पण वडिलांच्या आजारपणामुळे तो तयार झाला नाही. वसंता तिच्यावर खूप प्रेम करी. तिच्या मनाविरुद्ध तो कोणतीही गोष्ट करत नसे. पण पुढे ती त्यालाच दुषणे देऊ लागली. तुम्ही लोकांनी मला फसवलत! या कोंढवाड्यात राह्यला मला आता नाही जमणार!वसंताने तिला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण अवघ्या सहा महिन्यातच ती त्याला कायमची सोडून मुंबईत परतली. वसंता अस्वथपणे वावरू लागला. तो अबोल बनला. मुलाच्या आणि सुनेच्या काळजीने वसंताचे वडीलही देवाघरी निघून गेले. जणू ईश्वरालाच जाब विचारायला. वसंता एकाकी पडला. त्याला आता त्या गावात रहावे असे वाटेना झाले. तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला. त्याची कॉलेजमधील मैत्रीण ज्योती एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होती. तिच्या मदतीने त्याच कंपनीत त्याला नोकरी मिळाली. ज्योती त्याच्याच गावची. तिची आणि वसंताची लहानपणापासूनच मैत्री होती. नोकरी मिळाल्यानंतर वसंता काही दिवस तिच्याकडेच राहिला. नंतर एका चाळीत खोली भाड्याने घेऊन राहू लागला.

टीन s s टीनदारावरची बेल वाजली. आणि वसंता एकदम विचारातून जागा झाला. दारावरची बेल कोणतरी वाजवीत होते. त्याने दरवाजा उघडला. एक नवीनच लग्न झालेले जोडपे दारात उभे होते. वसंताने त्यांना आत येण्याची विनंती केली. त्यांनी आत येत येतच आम्ही आजच या चाळीत तुमच्या शेजारच्या रूम मध्ये राह्यला आलोय. मी येथे जवळच एका कंपनीत नोकरीला आहे. माझं नाव विरेंद आणि हि दीपिका. आम्हाला आजच्या रात्रीसाठी तुमच्या कडील काही वस्तू हव्यात. उद्या आम्ही परत करू!खाली बसण्याअगोदरच त्यांनी आपल्या येण्याचा हेतू सांगितला. थोडावेळ एकमेकांच्या गप्पा झाल्या. ओळखी झाल्या. आणि वसंताने त्यांना निरोप दिला.

चाळीतल्या जगाचे वातावरण वेगळे. तशी इथल्या माणसांची जीवनविषयक धारणाही वेगळी. जगण्याच्या कल्पना वेगळ्या. काहीजण सगळ्यांच्या सुख दुखात मिसळणारे. अडचणीत आपुलकीने साथ देणारे. तर काहीजण रिकाम्या मनाला विरंगुळा म्हणून शेजाऱ्यांच्या लहान सहान गोष्टीत लक्ष घालणारे. त्यांच्या विषयी द्वेष, अहंकार, मत्सर मनात ठेवणारे. या सर्व गोष्टीना वसंताची चाळही अपवाद नव्हती. चाळीच्या या वातावरणाचा त्याला कंटाला येई. पण वसंता सहसा चाळकऱ्यांच्यात मिसळत नसे.

मात्र विरेंद्र आणि दीपिकाशी त्याची मैत्री चांगलीच जुळू लागली. दिवसामागून दिवस जात होते. वसंतासहित विरेंद्र आणि दीपिकालाही या चाळीचा कंटाळा येई. ती दोघे कधी कधी गप्पा मारण्यासाठी वसंताच्या खोलीत येत. जेव्हा त्यांना वसंताच्या पूर्वआयुष्याची हकीकत समजली तेव्हा त्यांना खूप दु:ख झाले. तेव्हापासून तर त्यांच्यात एका अनोख्या मैत्रीचं नातं निर्माण झालं. वसंताला कधी कधी ऑफिसमधून यायला वेळ झाला तर दीपिका त्याला स्वयंपाक बनवू देत नसे. त्यांच्याकडेच जेवायला बोलवत असे. जेवताना त्यांच्या खूप गप्पा रंगत. परंतु विरेंद्रला मद्य आणि सिगारेटचे व्यसन होते. हे वसंतला आवडत नसे. तो याविषयी एखदा त्याच्याशी बोलला सुद्धा. पण जगातल्या साऱ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला माणसाने शिकले पाहिजे. उपभोग घेण्यासाठी तर या सर्व गोष्टी निर्माण झाल्याहेत. हे त्याच्या जीवनाचं तत्वज्ञान होतं. त्याचं हे वागणं दीपिकाला तर आजीबातच आवडत नसे. कधी कधी यावरून दोघांच्यात भांडणेसुद्धा होत. पण वसंता पुन्हा दोघांना एकत्र आणत असे. त्यामुळे ते बाहेर फिरायला जाताना सुद्धा वसंतालाही घेऊन जात. त्याच्याजवळ त्याची पत्नी नाही याची दीपिकाला खूप खंत वाटे.

एक दिवस ऑफिसातून परत येताना वसंताला चांगलीच थंडी वाजून आली. त्याला तापही आला. डोकंही खूप दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याची मैत्रीण ज्योती त्याला स्कुटीवरून घरी पोहचवायला आली. तिने त्याला चहा बनवून दिला. औषधे दिली. आता जरा वसंताला बरं वाटू लागलं होतं. इतक्यात दीपिका खोलीत आली. वसंताने तिची ज्योतीशी ओळख करून दिली. त्या दोघींनी थोडावेळ गप्पा मारल्या. आणि ज्योती निघून गेली. वसंता नको नको म्हणत असतानाही दीपिका त्याच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवू लागली. तिच्या केसातील फुलांचा वास त्याला सुखावून गेला. कितीतरी दिवसांनी त्याला स्त्री स्पर्श होत होता. वाकल्यामुळे तिच्या गालावर आलेली केसांची बट यामुळे तर ती अधिकच सुंदर दिसत होती. काहीतरी खायला घेऊन येते म्हणून दीपिका तिच्या खोलीत गेली. तेव्हा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वसंता कितीतरी वेळ तसाच पहात राहिला. काही वेळाने ती त्याच्यासाठी डाळ भात घेऊन आली, तेव्हा चाळीतल्या नाडकर्णी बाई हळूच आत डोकावून  गेल्या. तिने वसंताला सांगितले, “ मी जेव्हा जेव्हा तुमच्या खोलीत येते तेव्हा ही बाई संशयाने माझ्याकडे पाहते.

सकाळी दार उघडून दीपिका वसंताच्या खोलीत आली. वसंता बेडवर पडून होता. तिने नुकतीच अंघोळ केली असल्यानं गुलाबासारखा तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. तो तिच्याकडे काहीशा अपराधी, याचनेच्या भावनेने, किंचितशा तारुण्याच्या ओढीने पहात होता. ताप गेला ना आज?” म्हणत नकळत तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. आणि मोकळ्या ओल्या केसांचा एक झुपका किंचित त्याच्या गालावर अलगद सोडून दिला. वसंताच्या नजरेत नजर मिळवत ती म्हणाली, “ एक विचारू का? तुम्हाला पुन्हा लग्न करावसं वाटत नाही का?” पण वसंता काहीच न बोलता एकटक वरती पहात हरवून गेला.

येथूनच हळूहळू वसंता आणि दिपिकातील जवळीक वाढत निघाली. ती त्याच्याकडे मैत्रीपेक्षा आता वेगळ्याच ओढीने पहात होती. वसंतालाही तिचा आधार वाटू लागला. दीपिकाला त्याच्या एकटेपणामुळे सुरुवातीपासूनच त्याच्या बद्दल आकर्षण वाटत होते. त्याच्या आजारपणात तिने त्याची शुश्रूषा केली. दोघांच्या मैत्रीचे, परिचयाचे रुपांतर हळूहळू ओढीमध्ये पुढे सरकत होते. दीपिकाला जरी यात आनंद मिळत होता. सुख मिळत होते. तरी वसंताच्या दृष्टीने तो एक आघात होता.

एका रविवारी संध्याकाळी चौपाटीवर फिरायला जाण्याचं तिघांनी ठरविलं होतं. विरेंद्र ऑफिस मधून तिकडेच येणार होता. सायंकाळी वसंता आणि दीपिका फिरायला बाहेर निघाली. नाडकर्णी बाईंची टीम मिसेस डिसुजांच्या खोलीबाहेर होतीच. त्यांच्या कुत्सित नजरा पाहून वसंत एकटाच पुढे चालू लागला. तरीही अहो डिसुजाबाई प्रेम काही वसंतातच फुलतं असं नाही ते ग्रीष्मातही फुलतं बरं का!हे नाडकर्णी बाईंचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहचलेच. पण दीपिका मुद्दाम त्याच्या जवळून चालू लागली. चौपाटीवर पोहचण्याआधीच ऑफिस मध्ये ज्यादा काम असल्याने मी आता येऊ शकत नाही म्हणून विरेंद्रचा फोन आला. वसंता नको म्हणत असतानाही दीपिका त्याला घेऊन चौपाटीकडे आली.

समोर विस्तीर्ण असा पसरलेला अथांग सागर. त्या सागरात मिसळू पाहणारा सायंकाळचा सूर्य. क्षितिजापासून किनाऱ्याच्या मिलनासाठी बेहोष होऊन धावत येणाऱ्या लाटा. त्यावरून झुळूझुळू वाहणाऱ्या थंड वायूलहरी. मऊ रेताड वाळूत भव्य थाटलेले भेळपुरीचे स्टॉल्स. दुडूदुडू बागडणारी रंग बिरंगी वस्त्रातली गोंडस मुले. आणि एकमेकांच्या हातात हात गुंफून हेच आपले जग आणि हेच जीवनाचे अंतिम सत्य समजून किनारी फिरणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आणि तरुण तरुणींच्या जोड्या. हे वेगळच जग पाहून दीपिका जणू पत्नी सारखीच वसंताला बिलगून चालू लागली. तिचा शिडशिडीत बांधा, लाल साडी, किंचित सावळा परुंतु आकर्षक दिसणारा तिचा सुंदर चेहरा, पाठीवरील लांब वेणी आणि केसांत सुवासिक हसत राहणारी पारिजातकाची फुले, गालावर रेंगाळणाऱ्या आणि सूर्याच्या डिंब झालेल्या प्रकाशात चमकणाऱ्या केसांच्या सोनेरी छटा पाहून वसंता कितीतरी दिवसातून आनंदी दिसत होता. पण तो अबोल होता. मूक होता.

त्याचा अबोलपणा पाहून दीपिकाच म्हणाली, “वसंत! मला तरी वाटतं माणसाने जीवन आहे तोपर्यंत आनंदात जगावं...धुंद होऊन रहावं...सगळीकडे फिरावं...जगातल्या सगळ्या सजीवावर प्रेम करावं. खरच! हे जग, हे जीवन खूप सुदंर आहे. फक्त त्याचा आस्वाद घेण्याची दृष्टी हवी. वसंत! प्रेमात केवढी मोठी शक्ती आहे. मला वाटतं अखेर प्रेमच सर्वश्रेष्ठ. प्रेमात माणूस विष देखील पितो! खोटं नाही हे! वसंताने तिच्याकडे पहात छानसं हास्य केलं. त्याच्या नजरेत नजर मिळवत दीपिका पुन्हा म्हणू लागली. खरच! स्त्री पुरुषाचे प्रेम खरे कि शारीरिक संबंध खरे! सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी शारीरिक सुख असावं. हे नैसर्गिकच आहे. स्त्री पुरुषाच्या प्रेमाची परिपूर्ती शेवटी मिलनानेच पूर्णत्व पावते ना? साऱ्या जगाला निसर्गाने हा प्रणयाचा रंग दिलाय आणि म्हणूनच मनुष्य खूष असावा. बेहोष असावा!तिच्या लांब सडक संवादाला पाहून वसंता म्हणाला, “खरच! तुम्ही किती काव्यमय बोलता? या जगाच्या दृष्टीने सत्यही बोलता. पण या जगात उपभोगापेक्षाही श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे तो ... त्यागाचा.

ती दोघे चालत चालत चणे खात एका खडकावर येऊन बसली. दीपिका पुन्हा म्हणाली, “तुम्हाला नाही वाटत! दुसरं लग्न करावं. आपला संसार असावा. संसाराच्या त्या वेलीवर फुले फुलावीत. आपलं एक हक्काचं घर असावं?” तुम्हाला खरं सांगू, “हातातील चण्याचा कागद बाजूला टाकत वसंता म्हणाला, ‘आयुष्यात खरं प्रेम एकदाच होत असावं! मी आजदेखील माझ्या आरतीवर प्रेम करतोय. कदाचित तिने आता दुसरं लग्नही केलं असेल. ती या वास्तवातील जगाचा अनुभव घेत कुठे का असेना? पण सुखात असावी अशीच मी रोज मनोमन प्रार्थना करतो. मला वाटतं प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषासह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमात असते. असली पाहिजे. केवळ शारीरिक सुखासाठी माणसानं दोन दोन लग्ने करावीत. छे! कुठेतरी माणसाला विवेक हवा. विचार हवा. संयम हवा.दीपिका निरुत्तर झाली. अस्वस्थेने त्याच्याकडे पाहू लागली.

इतक्यात क्षितिजापासून धावत आलेली थंडगार पाण्याची लाट दोघांनाही भिजवून गेली. तिने भितीपोटी वसंताला मिठीच मारली. तिने त्याच्या नजरेत नजर मिळविली. तिच्या तोंडून अस्पष्ठ शब्द बाहेर पडले, “वसंत! मला फक्त तुम्ही हवात! तुमचं प्रेम हवं! तुमचा आधार हवा! म्हणत तिने त्याच्या छातीवर मान टेकवली. वसंताने तिच्या मिठीतून आपले अंग क्षणात सोडवून घेतले. निघण्यासाठी तो उभा राहिला. पण नकळत तिने त्याच्या हाताचा उठण्यासाठी आधार घेतला. रागवलात!म्हणत अगदी हळूवारपणे त्याचा हात आपल्या हातात घेऊन ती चालू लागली. वसंता काहीच बोलत नव्हता. दोघेही घराकडे परतले. चाळ जवळ आली तशी दीपिका अंतर ठेवून चालू लागली. दीपावलीचे दिवस सुरु झाल्याने सगळ्या चाळीत रंगबिरंगी दिव्यांची उजळण सुरु होती. त्या प्रकाशात लोकांच्या अर्थपूर्ण नजरा दोघांनाही टाळता आल्या नाहीत.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंत ऑफिसला जाण्यासाठी स्टेशनकडे निघाला. स्कूटरवरून निघालेल्या ज्योतीने त्याला रस्त्यात पाहिले. ती त्याच्या जवळ येऊन थांबली. आणि त्याला सोबत घेऊन निघाली. ती थेट एका हॉटेलसमोर येऊन थांबली. वसंताने इकडे कुठेविचारल्यावर, “वसंत! आज ऑफिसला जायचं नाही? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. जे मी तुला या वर्षभरात सांगू शकले नाही. वसंत काहीच न बोलता अबोलपणे तिच्यामागे हॉटेलमध्ये आला. ज्योती आज काहीशी अस्वस्थ वाटत होती. शून्य नजरेने फिरत्या फैनकडे पाहणाऱ्या वसंताकडे पहात ती म्हणाली, “वसंत! एक विचारू! असा किती दिवस एकटा राहणार आहेस. असं एकाकी जीवन जगून शेवटी काय मिळवणार आहेस तू? वसंत! आयुष्य हा जुगार आहे. त्या जुगारातील हार म्हणजे दु:ख आणि जीत म्हणजे सुख. कदाचित सुख माणसं वाटून घेतील. पण दु:ख? ते एकट्यालाच सोसावं लागतं. वसंत! माझ्या आतमध्ये तुझ्याबद्दल एक ओढ निर्माण झालीय. जी तुझ्या इतक्या वर्षाच्या सहवासात कधीच जाणवली नव्हती. हवं तर त्याला प्रेम समज. हो प्रेमच. तुझ्या एकाकी जीवनात मी सुख निर्माण करेन. आनंद निर्माण करेन. मला फक्त तुझ्या ह्रदयात स्थान दे. वसंत! तुझा संसार मी पुन्हा उभा करेन.वसंत अवाक होऊन, अस्वस्थ नजरेने तिच्याकडे पहात राहिला. त्याच्या डोळ्यात पहात ज्योती पुन्हा म्हणाली, वसंत! मला माहितेय, तू आता होकार देणार नाहीस. तू दीपिकावर प्रेम करतोस ना? खरय हे! तुझ्या शेजारच्या नाडकर्णी बाईकडून मला सर्व समजलय. पण वसंत तू चुकतो आहेस. तुझ्या या क्षणिक मोहापायी उद्याचे एक कुटुंब नष्ठ होणार आहे. दीपिका एक संसारी स्त्री आहे. तुझं एकाकी जीवन पाहून तिला कदाचित तुझी ओढ वाटत असेलही. पण... पुढचं येणारं आयुष्य? तू विचार केलास या सर्व गोष्टींचा. वसंत तिच्याकडे शून्य नजरेने पहात सर्व शांतपणे ऐकत होता. वसंत! ते बाहेर रस्त्याकडे बघ. सुंदर कपड्यात आपल्याच विश्वात दंग होऊन चालणाऱ्या त्या बेहोष तरुणी बघ. उद्या कुठल्या या तरुणीच्या चेहऱ्यावर वार्ध्यक्याच्या खुणा दिसणार नाहीत. अरे! आज टवटवीत दिसणारी कोणती फुले उद्या निर्माल्य होणार नाहीत. वसंत! ते प्रेम नव्हे. ते फक्त आकर्षण आहे. एकमेकांच्या शरीराविषयी वाटणारे. तिला नवरा असतानाही........आणि विरेंद्रचं काय रे? तो नाही का एकाकी पडणार. कुठे वाहत निघालाय तुम्ही?

वसंताचे डोळे भरून आले होते. त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले. ज्योती! मी कधीच कोणावर प्रेम केलं नाही. मी फक्त माझ्या आरतीवर प्रेम केलय. आणि शेवट पर्यंत मी फक्त तिचाच राहीन. तू फक्त माझी मैत्रीण आहेस. खूप जवळची. हे नातं बदलण्यास मला नको भाग पाडूस. प्लिज मला समजून घे. इतक्यात वेटरने समोर चहा आणून ठेवला. ज्योतीने त्याच्या हातात कप दिला. सागरातील तुफानी लाटांनी वेगात धावत येऊन किनाऱ्यावर कचरा सोडून क्षणात विरून जावं तसं वसंताने तोंडापर्यंत पोहचलेला कप हातातून खणकन सोडून दिला. त्याची नजर हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या एका स्त्रीकडे होती. तिला पाहताच रेसमधील घोड्यांनी इशारा मिळताच जसं धावत सुटावं तशी ज्योती तिच्या दिशेने धावत पळतच बाहेर पडली. वसंता कितीतरी वेळ ज्योतीची वाट पहात राहिला. पण ती परतलीच नाही. तो हताश होऊन घरी परतला..

सायंकाळ झाली होती. वसंता बेडवर अस्वस्थ होऊन निस्तेज पडला होता. हॉटेलमधून बाहेर पडलेली ती स्त्री त्याला आतून पार ढवळून काढत होती. इतक्यात दरवाजा उघडून दीपिका आत आली. त्याच्या शेजारी बसत म्हणाली, “आज बरे वाटत नाही का? चहा आणून देऊ? बरे वाटेल तुम्हालाइतक्यात बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कुणाच्या खोलीत यावेळी शिरली आहेस. दीपिका…s...s.. सगळ्या चाळीला नाटके दाखवू नकोस. या जगातले सगळे मित्र फसवे असतातम्हणतच विरेंद्र आत आला. तो भरपूर मद्द प्याला होता. त्याच्या आवाजाने शेजारील लोक जमू लागले. त्याच्या भीतीने दीपिका वसंताला बिलगली. पण मैत्रीचा गैरफायदा घेणाऱ्या फसव्या मित्राजवळ जाऊ नकोसम्हणत त्याने तिला खोलीबाहेर ओढतच नेलं. विरेंद्र बाहेर पडत बरळत होता, “ वसंता तू नाहीस चुकला. चुकलो मीच. इतक्या जवळ तुला करायला नको होतं. विश्वासघात केलास तू"

मैत्री म्हणजे अशी गोष्ट नव्हे कि जी तोडली कि संपली. तिचे धागे अंतरंगात खोल गुरफटलेले असतात. त्याच्यावर ताण पडला वा ते धागे तुटले तर वेदना अटळ असतात. वसंता हताश झाला. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिला. असं व्हायला नको होतं. त्याला सारखं वाटत होतं. आपण मोहाला बळी पडून विरेंद्रच्या संसाराशी त्याच्या मैत्रीशी भातुकलीचा खेळ खेळलोय. बस्स थांबायला हवंय हे आता.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंताने बैग  भरली. ऑफिसात आला. राजीनामा लिहिला आणि बॉसच्या केबिनमध्ये दिला. ज्योतीही अजून ऑफिसात आली नव्हती. काही वेळ तिची वाट पहिली. आणि स्टेशनच्या दिशेने गावी जाण्यासाठी झपाझप पावले टाकत निघून गेला.

गावी पोहचला तेव्हा अंधार बराच दाटला होता. नदीचा पूल ओलांडून वसंताने गावात प्रवेश केला. गाव तोच होता. पण आज खूप बदल वाटत होता. दीपावली असल्याने गावात फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. रंगबिरंगी दारुगोळ्याने आकाश उजळून निघत होते. नवीन वस्त्रानी स्त्री पुरुष सजलेले होते. वसंता पांदीतून चालत टेकडीवरील आपल्या घराजवळ आला. आणि अवाक होऊन समोर आश्चर्याने पहातच राहिला. त्याच्या घरावर दिव्यांचा रंगबिरंगी प्रकाश पसरला होता. हे आपलेच घर ना?’ क्षणभर त्याला खात्रीच पटेना. तो घरासमोर आला. घरापुढील अंगण आणि तुळशीचे वृंदावन स्वच्छ सारवलेले होते. अंगणात सुरेख रांगोळी रेखाटली होती. रातराणीच्या फुलांचा सुगंध अंगणात दरवळत होता. त्याने दरवाजाकडे पहिले. एक सुरेख निळसर रंगाचा शालू नेसलेली स्त्री दरवाजात उभी होती. त्याने तिचा चेहरा निरखण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमधून बाहेर पडलेला तोच चेहरा होता. होय! ती त्याची पत्नी आरती होती. वास्तवातील खऱ्या जगाचा अनुभव घेऊन पुन्हा त्या खेड्यात ती परत आली होती. त्याने पलीकडे पहिले. जीन्स टॉप घातलेली एक तरुणी घराच्या भिंतीला आकाशकंदीललावत होती. तिने वसंताकडे पाहत स्मित हास्य केलं. त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ती ज्योती होती. खरं प्रेम आणि खरी मैत्री काय असते हे ती आज न सांगताच त्याला पटवून देत होती....

#ज्ञानदेवपोळ

No comments:

Post a Comment