Tuesday, May 16, 2017

पावसा पावसा...

पावसा पावसा... 
नुसताच गरजू नकोस 
हंडग्यासारखा... 
येणारच असशील तर पूर्वीसारखा आरडत ये 
विजांचा कडकडाट करीत ये 
झाडं पाडीत ये 
माती उडवीत ये 
थांबू नकोस एवढ्यावरच 
उडवून टाक घरावरचा पत्रा 
चुलीवरच्या आमटीत ढासळ 
चुलीपुढच्या म्हातारीच्या डोसक्यात 
उडालेली दगडं पाड 
बाहेरच्या गोट्यावर ढासळ 
विजा पाडून म्हसरं मार 
भिताडाना बंदिस्त ठेवू नकोस आता 
तुझ्या मुताच्या प्रचंड धारा सोडून दे 
करून टाक भिंतींची डिलिव्हरी 
होऊदे एखादाचं मोकळं त्यांना 
तुला हात जोडणारी 
आतली म्हातारी संपव 
खंगलेला म्हातारा विझव 
ओली बाळंतीण गाडून टाक 
तिच्या तान्हुल्याला पुरून जा 
पावसा पावसा... नुसताच गरजू नकोस 
हंडग्यासारखा... 
चांगला आरडत ये 
विजांचा कडकडाट करीत ये 
येणारच असशील 
तर पूर्वीसारखा ये...

No comments:

Post a Comment