Thursday, May 11, 2017

घुसमटमाणूस करपून जाईल असं भयान ऊन. नजर जाईल तिकडं नुसत्याच दिसणाऱ्या उन्हाच्या झळा. डोंगराच्या खालच्या अंगाला उन्हांत चाऱ्यासाठी सैरावैरा पळणारा मेंढराचा एक कळप. काळ्या पांढऱ्या मेंढरांना अडवणारे कोस्या पटक्यातले म्हातारे माणदेशी धनगर. सुकलेली झाडं आणि माळरानावर पसरलेली तरवडची हिरवी झुडपं. अशा आग पाखडणाऱ्या उन्हाच्या झळा हळुवार वाऱ्यासोबत माळरानातल्या पांढरीच्या वस्तीवरल्या घरास्नी येवून धड़कत होत्या. जागोजागच्या मोडक्या छप्परातली गुरे माना टाकून रवंथ करीत निपचिप पडली होती. उकीरंडयाच्या काठाला असलेल्या वाळक्या झुडपांच्या सावलीत झुरणी लागून कोबंड्या निवांत पेंगताना दिसत होत्या... 

प्रचंड उन्हातून अखेर नांगरलेल्या ढेकळातील पायवाट सोडून मी पांढरीच्या वस्तीजवळ पोहचलो. पिपर्णीच्या सावलीत धापा टाकित पडलेलं तांबडं कुत्रं माझ्या पायांच्या आवाजानं "वॉव वॉव" करीत जागचं हललं. घामानं माझं सारं अंग भिजून निघालं होतं. खिशातील रुमालाने मी कपाळावरचा घाम पुसला. मानेवरचा घाम पुसताना चणचणत होतं. आतील बनियन पाठीला चिकटून बसलेलं. थोडा विसावा घ्यावा म्हणून मी सावलीत बसलो. माळावरच्या मुख्य रस्त्यावरून पुनवेला भरलेल्या पारगावच्या जत्रेत नारळ द्यायला डोक्यावर टॉवेलाची घडी टाकून निघालेला बायका दिसत होत्या. सोबत असल्या उन्हा तान्हात त्यांच्या मागे उड्या मारत लहान पोरं चालली होती. तर काहीजण देवदर्शन करून गावाकडच्या दिशेने परत येताना दिसत होते. शेजारच्या पारगावची यात्रा असलेनं इथली बरीच घरे ओस पडलेली. अशा सुन्न पडलेल्या दुपारी वस्तीवरची पार्वती म्हातारी उंबऱ्याला येऊन हताश बसलेली माझ्या नजरेला दिसली. तिच्या घरापुढच्या पिपर्णीच्या झाडाला एक शेरडी अन दोन बारकी करडे पेंगत होती. म्हातारी कुणाची तरी वाट पहात असावी. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसल्या कि तिची घालमेल स्पष्ट जाणवत होती. बऱ्याच वर्षात तिला भेटणं जमलं नाही. गावाशी नाळ तुटून आता बरीच वर्षे झालीत. इथली किती माणसं मेलीत किती जिवंत असतील ते सुद्धा नीट माहित नाही. पण या वस्तीच्या बऱ्याच आठवणी शहरात छळत राहतात म्हणून मुद्दामच वाट वाकडी करून, ओसाड पडलेली शेतं तुडवत या वस्तीकडे आलो होतो. लहानपणी ही समोरची पाठीला पोक आलेली पार्वतीम्हातारी घरामागची सीताफळे तोडून मला द्यायची. शेतातली गाजरं द्यायची. मुगाच्या, चवळीच्या शेंगा खायला द्यायची. तिचा नातू व्यंकट आमच्यासोबत खेळायला यायचा. आता काळाच्या ओघात म्हातारी थकलेली स्पष्ट दिसत होती. लहानपणी टायरची चाकं फिरवत कित्येकदा या वस्तीपर्यंत अगदी सहज यायचो. कित्येक नवे संवगडी या वस्तीवर मिळायचे. टायर पळवयाच्या शर्यती या समोरच्या उघड्या माळावर लागायच्या. आजूबाजूला हिरवीगार शेतं असायची. तो खालचा कोरडा पडलेला ओढा नेहमी पाण्याने भरून वाहायचा. त्या ओढ्यावरच्या भिरुड लागलेल्या आंब्यावरचं पाडाचं आंब कोपरावर वगुळ येऊपर्यंत खाल्ले होतं. आता कित्येक दुष्काळ झेलून या थकलेल्या घरांच्या पुढे कधी काळी कापसाच्या जळणांचे ढीगच्या ढीग पडलेले असायचे. बाहेरच्या सोफ्यात धान्यांची थापी पडलेली दिसायची. उघड्या माळावरच्या कुरणात चरताना गाई म्हशींच्या हंबरण्याचा आवाज घुमायचा. शिवारातून बैलगाड्या धावायच्या. ओढ्यावर "पुक पुक" करणारं पिस्टनचं इंजिन वाजयचं. त्याचा निघणारा नादमधुर आवाज कानांना साद घालत रहायचा. काळाच्या तडाख्यात इतका कसा बदल झाला? इतकं उद्धवस्त जिनं का यावं इथल्या माणसांच्या नशीबी? शेकडो प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. सावलीत बसल्याने मला थोडं बरं वाटू लागलं होतं. आता उठावं आणि पार्वती म्हातारीला भेटावं. तिची विचारपूस करावी. तिचा नातू आता कुठे असतो ते विचारावं? या विचारात मी उठणार इतक्यात एक लाल रंगाची चारचाकी गाडी रस्त्याचा धुरळा उडवीत म्हातारीच्या घरासमोर येऊन थांबली. मघापासून उंबऱ्याला हताश होऊन बसलेली म्हातारी गडबडीनं काठी टेकत उठली. कसलंतरी गठुळ म्हातारीनं गाडीवाल्याला दिलं. गाडी भर्रकन गावाकडे निघून गेली. आणि पाठमोरी उभी राहिलेली म्हातारी हात हलवत गाडीला बघत उभी राहिली...

मी गडबडीनं रस्ता ओलांडून तिच्या जवळ गेलो माझी ओळख करून दिली. मघापासून हताश होऊन बसलेल्या म्हातारीला माझ्या भेटीनं भलतीच तरतरी आली. मला चुलीपुढचा पाट बसायला देत ती म्हणाली,
"कवा नहान असताना बघितलेला बाबा तुला!"
"उन्हाची कशी वाट वाकडी करून आलास!"
म्हातारीला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी दिली. पण ती गाडी कोणाची होती? तिनं गठुळ कसलं दिलं? कोणाला दिलं? मला जाणून घ्यायचं होतं. मी म्हातारीला विचारलं,
"गाडी कोणाची होती? काय गठुळ दिलंस?"
म्हातारीनं दिलेल्या उत्तरावर मी वेडा कसा झालो नाही तेच मला कळत नाही. तंत्रज्ञानाच्या जगापासून शेकडो मैल लांब असणारी आणि यमाचा रेडा अवती भोवती फिरणाऱ्या घरातली पार्वती म्हातारी विषन्न होऊन मला सांगू लागली, "चार सालं झाली बघ! शेतात राबून पॉट काय भागंना झालंय बाबा! अर्धी वावरं विकून नातीसनी मंडवळ्या बांधल्या! पण गरीबासनी शिकून तरी हायत्या का नोकऱ्या? शेतवाल्यासनी कोण पोरी बी दीना झाल्याती! आता वरीस हुईल बघ! आमचा व्यंकट म्हमईला गेलाय! नुकरी मिळना म्हनून रंगाच्या कामात जातुया! पायलीभर ज्वारी अन लसणाच्या दोन पेंडया दिल्या गठुळ्यातन! सावळा अन्नाच्या म्हमईला निघालेल्या गाडीतन! हातानं करून खातंया पॉर! द्याला तरी काय हाय का शेतकऱ्याकड आता? त्यात निसर्ग ह्यो असा?"...

मी स्तब्ध झालो. माणसांची दशा अशी का होऊ लागलीय मला कळेना. अखेर मी तिचा निरोप घेऊन चालू लागलो. पण पाचशे रुपये एस.टी च्या तिकिटाला नाहीत म्हणून आई बापाला आणि म्हाताऱ्या आज्जीला भेटायला अखंड वर्षात गावी न येऊ शकलेला व्यंकट काही डोक्यातून जाईना. भविष्यात नोकरी लागून त्याच्या दारात मंडप उभा राहील कि नाही? मला माहित नाही. पार्वती म्हातारी चुलीच्या बाजूला असलेल्या जात्यावर व्यंकटच्या लग्नाची हळद मरायच्या आत तरी दळेल का? ते ही मला माहित नाही. पण घरातल्या तळ गाठलेल्या कणगीतल्या दोन पायऱ्या ज्वारीचं गठुळ अन आड्याला टांगलेल्या दोन लसणाच्या पेंढया काढून, नातवाला जागतिकीकरणाच्या रेट्यात जगवू पाहणारी पार्वती म्हातारी मला कितीतरी मोठी वाटली. होय! आभाळा एवढी मोठी....
No comments:

Post a Comment