Saturday, April 8, 2017

आड (बावडी)


...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी होती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. "नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला!" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो...

...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं. गावाच्या लग्नाच्या द्रोण, पत्रावळ्या पोटात घेऊन आड अर्धा मुजलेला असतो. आता रात्रीच्या अंधारात अंगावर पडणाऱ्या फुटक्या दारूच्या बाटल्याना झेलत आड रात्रभर रडत राहतो...
फोटो सौजन्य flickr

No comments:

Post a Comment