Sunday, April 2, 2017

तमाशा...

चैत्र निघाला की गावागावात यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदार. तमाशा सम्राट अमूक अमूक यांच्यासह लेखणीसम्राट तमुक तमुक यांचा “बहिणीची माया अर्थात भाऊ माझा पाठीराखा” हा वग उद्या रात्री ठीक दहा वाजता सादर होणार आहे, अशी हाळी गावागावातल्या लाऊडस्पीकर दणाणून जायची. तमाशाचा टेम्पो गावात शिरला की लाउडस्पीकर वरुन पुकारणाऱ्या माणसाला जास्तच जोर चढायचा. आणि खरा यात्रेचा बहर येथूनच सुरु व्हायचा. तमाशाचा फड गावात उतरतोय तोपर्यंत साऱ्या गावात बातमी पसरलेली असायची. तमासगीरा भोवती पहिली पडायची ती गर्दी लहान पोरांची... 

तमासगीरांची जेवणावळ झाली की पारावर तमाशा भरायचा. दुपारी व्हायचा तसा रात्रीही प्रचंड गर्दीने भरलेल्या पटांगणात तमाशा भरायचा. तमाशाच्या या खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, रंगबाजी, फार्स आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. त्यातील गण म्हणजे विशेषता शाहीर गण गायचा. आणि त्याचे साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवायचे. गण संपला ढोलकी घुमु लागायची. ढोलक्या घामाघूम झाला की पायात चाळ बांधून आणि स्टेजच्या पाया पडून नर्तकिंचा नाच सुरू व्हायचा. मग सुरु व्हायची गौळण. आणि बाजूला कृष्णाच्या लीला. मग सोंगाड्या स्त्री वेशात मावशी बनून आला की तमाशाला खरा रंग चढायचा. गोपीका दूध, दही, लोण्याचे हंडे घेवून मथुरेला निघू लागल्या की वाटेत पेंद्या त्यांना आडवा आलाच म्हणून समजा. हा पेंद्या म्हणजे तमाशाचा मुख्य आधारच. हसवून हसवून पोट दुखायला लावणे हे याचे प्रमुख काम. त्यानंतर सवालजवाब होत. शृंगारिक लावण्या व्हायच्या. आणि शेवटी तमाशाचा आत्मा म्हणजे वग सुरु व्हायचा. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक कथा नाट्य रूपाने सादर केली जायची. मघाचा सोंगाड्या आता चढलेल्या रात्रीसोबत वगामध्ये महाराजांचा शिपाई झालेला असायचा. आणि लोकांना हसवत हसवत वग पुढे सरकवत न्यायचा. पहाटेपर्यंत चालणाऱ्या वगाचा शेवट गावकऱ्यानां काहीतरी संदेश देऊन द्यायचा. तमाशा संपलेला असायचा. लोक तमाशातील पात्रांच्या चर्चा करत पान्हावल्या डोळ्यांनी घराकडे निघायचे. आणि तमासगीरांचे बिऱ्हाड पुढच्या यात्रेकडे धावायचे... 

तमाशा आजही आहे. पण काळानुसार आता तो खूप बदललाय. एक काळ होता. जेव्हा तमाशा ही फक्त एक लोककला होती. लावणी हा प्राण होता. तर वग हा त्याचा आत्मा होता. तमाशा पाहणारी जशी लोकं होती. तशी तमाशा जगणारी कलाकार मंडळी होती. ही कला जिवंत ठेवण्यासाठी उपाशी पोटांच्या खालची कंबर हलवणाऱ्या नर्तकी होत्या. छम छम वाजणारे घुंगरु होते. त्यांना दिवस रात्र खेळवणारे स्त्री नर्तकिंचे भक्कम पाय होते. फुगलेले पोट घेऊन बोर्डावर नाचणारी विठाबाई होती. आयुष्यभर वगात राजा बनून दिवसा भाकरीला महाग असूनसुद्धा कला जिवंत ठेवण्यासाठी धरपडणारे सोंगाडे होते. पण काळानुसार तमाशाचा ओर्केस्ट्रा झाला. छे! छे! प्रेक्षकानीच त्याचा ओर्केस्ट्रा बनवला. यात्रे दिवशी तो आता गावागावातल्या राजकीय पुढार्यांच्या हातातले बाहुले बनू पाहतोय. नऊवारी साडीत लावणीवर नाचणाऱ्या आणि खरी तमाशाची कला अंगात जोपासलेल्या जेमतेम दिसणाऱ्या स्त्रिया आता तरुण पोरांना समोर बोर्डावर नको वाटतात. अंगावर तोकडी कपडे घालून “अजून बारीक बारीक बारीक” कंबर आणि छाती हलवणाऱ्या तरुण पोरी आज तमाशाचा आत्मा बनू पाहताहेत. एकेकाळी तमाशातील “वग” पाहून त्याची सुपारी ठरायची. आज तमाशात तरूण पोरी किती, त्या दिसतात कश्या आणि त्या ढुंगण हलवतात कशा? त्यावर आता तमाशाची सुपारी ठरतेय. सगळी पंचक्रोशी दणाणून पहाटेपर्यत चालणारा “वग” आता नामशेष होतोय. त्याची जागा आता धिंगाणा घालणाऱ्या आक्राळ विक्राळ गाण्यांनी घेतलीय. वग सादर करणारे वयस्क कलावंत आता मागे बसून प्रेक्षकामधून कोणी “वग सरू करा” असा आवाज देतय कि नाही याची वाट पाहत राहतात. आणि गावागावातील वग पाहणारी जुनी जाणती मंडळी मागच्या रांगेत बसून पुढच्या नवीन पिढ्यांना “वग होवू द्या की आता सुरु” म्हणून आवाज देत राहतात. ढोलकी, डफ, चौंडक, टाळ, तुणतुणे, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल ही वाद्ये आता तमाशाची सुरवात करण्यापुरतीच राहतील की काय अशी भीती वाटतेय. काळानुसार तमाशा बदलतोय पण तो इतकाही बदलायला नको की त्याचा आत्माच हरवून जावा. आणि खरा खुरा तमाशा जन्माला येणाऱ्या नवीन पिढ्यांना पुस्तकात भेटावा... 

घराघरात शिरू लागलेले टीव्ही, मल्टीप्लेक्स्, इंटरनेट यांच्या पुढे अजून किती दिवस तमाशा तग धरेल नाही सांगता येत. पण मातीतून जन्म झालेल्या आणि कित्येक पिढ्यांनी सांभाळ केलेल्या या लोककलांची आपण बदलांच्या आणि नवीन सुधारणांच्या नावाखाली अक्षरशा माती बनवू पाहतोय. कित्येक फडमालकांना सुपारी नाही म्हणून तंबूत बसून रहावे लागतेय. एक सिझन पार पाडायला लागणाऱ्या 25 ते 30 लाखांचा ताळमेळ घालताना फडमालकांच्या नाकी नऊ येतेय. काळानुसार बदलून सुद्धा कित्येक तमाशा मंडळांच्या राहुट्या कायमच्या बंद पडू लागल्यात. त्या तंबूच्या आतील पोटे कुटुंबासहित उपाशी पडत आहेत. आयुष्यभर या कलेची सेवा करून तमाशा जगलेला खरा कलावंत आज एखान्द्या पडक्या घरात बीड़ीचा धूर हवेत सोडून आपण पाहिलेली स्वप्ने जाळून घेत आहे. शेवटी गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला हा लोकनाट्याचा समृध्द आविष्कार आज खेड्यापाड्यातून शेवटच्या घटका मोजतोय हे मात्र नक्की...

No comments:

Post a Comment