Saturday, April 15, 2017

म्हातारा



वस्तीवर गुरांची वैरण काडी करून गोठ्याच्या बाहेर मांडलेल्या पाय मोडक्या करकरणाऱ्या खाटेवर आकाशातल्या पुसट चांदण्या बघत, डोळे मिच मिच करत रोज रात्री तो म्हातारा पडून राहतो. देहाच्या जीर्ण सांगाड्या सोबत. पण म्हातारीच्या जीवघेण्या आठवणी त्याला झोपूच देत नाहीत. डोळा लागला की म्हातारी त्याच्या स्वप्नात येते. "लेकानं या साली माळावरच्या विहिरीची परडी केली नाही की लेकींना माहेर केलं नाही!" असं काय बाय ती त्याच्याशी बोलत राहते. मग चढणाऱ्या रात्रीसोबत त्याची व्याकुळता गडद होत जाते...
...स्वप्नातून जागा झाला की अंधारात तो करकरणाऱ्या खाटीवरून उठतो. म्हातारी इथेच कुठेतरी आजूबाजूला उभी आहे असा भास त्याला होतो. मग डोळे मिठून तो हलणाऱ्या आकृतीच्या दिशेला हात जोडतो आणि पुटपुटतो, " लेकानं नाय माहेर केलं तरी माझा जीव हाय तवर मी लेकीसनी माहेर करीन!" असं काय बाय एकटाच बोलत पुन्हा काळोखात कुशी बदलत रात्रभर तळमळत पडून राहतो...

No comments:

Post a Comment