Tuesday, January 3, 2017

नदी

डोंगरदऱ्यातून नागमोडी वळणे घेत गावाबाहेरून एका वळणावर डोह करुन वाहणारी नदी होती. झुंजू मुंजू झालं की नदीत पोहणारी माणसं होती. नदीत झरे होते. झऱ्यातून घागरी भरून पाणी भरणारे मजबूत देहाचे खांदे होते. घाटावर सकाळी कपड्यांचा "फट् फट्" घुमणारा धुण्याचा आवाज होता. बायका माणसांचा किलबिलाट होता. पक्षांचा चिवचिवाट होता. नदीतल्या डोहात "पुक् पुक्" आवाज करीत पाणी ओढणारं पिस्टनचं इंजन होत. त्यावर भिजणारे पानमळे होते. वरच्या अंगानं खळखळत येवून नदीला मिठी घालणारा ओढा होता. पावसाळ्यात नदी फुगल्यावर ओढयाला चढणारा मासा होता. रात्री टायर पेटवून त्यांना पकडणारी माणसं होती. दगडात लपणारे खेकडे होते. पाण्यावर खेळणारे विरुळे होते. "डराव डराव" ओरडणाऱ्या बेडक्या होत्या. उन्हं अंगावर झेलत डोळे मिटून नदीत डुंबणाऱ्या गाई म्हशी होत्या. म्हशी बुडल्यावर पाण्यावर तरंगणाऱ्या त्यांच्या अंगावरच्या गोमाश्याही होत्या. पलिकडच्या काठाला बैलगाड़ी पार होताना चाकांच्या लोखंडी धावेतून "कुर कुर" निघणारा वाळूचा नादमधुर आवाज होता. नदी होती गावाची संस्कृती. माता. भगीरथी. अन्नदाती. तिनेच विणल्या निसर्ग आणि मानवाच्या नात्यातील कित्येक गोष्टी. तिनेच अंगाखांद्यावर खेळवले गावचे कित्येक चिमुकले जीव. तिनेच वाढविल्या आणि जगविल्या गावच्या कित्येक पिढया...
...नदी आजही असते. पण पहिल्यासारखी आता पावसाळ्यात फुगत नसते. नदीवर आता धरण असते. त्यातून सोडलेलं काळे पाणी सोबत घेऊन ती आता वाहत राहते. नदीतून आता "पुक् पुक्" घुमणाऱ्या पिस्टनच्या इंजनचा आवाज होत नसतो. यांत्रिक मोटारी आता नदीच्या पाण्यासाहित तिची आतडी दिवस रात्र ओरबाडत राहतात. तिच्या काठावरचे पानमळे कधीच गळून पडलेले असतात. तिथे आता ऊसाची मळी पसरलेली असते. नदीत कधी कधी छोटे मासेही दिसतात. शहरातून सुट्टीला गावी आलेली मुलं आणि त्यांच्या मम्मा त्यांना आता “फिश” म्हणून ओळखतात. नदी उन्हाळ्यात उघडी पडते. बोडकी दिसते. तिच्या पोटातले सांगाडे उघडया पडलेल्या खडकवाटे दिवस रात्र अश्रू सोडत राहतात. नदीतले झरे आटलेले असतात. तिथली जागा झाडा झुडपांनी व्यापलेली असते. नदीला मिठी मारण्यासाठी गावाबाहेचा ओढा व्याकूळ झालेला दिसतो. पण माणसानी त्याला मध्येच कापलेला असतो. नदीचे पोटही आता फुटलेले असते. तिच्या पोटातील वाळू दूर शहरातल्या उंच इमारतींच्या भिंतीत विसावलेली असते. लहानपणी आपल्याच अंगाखांद्यावर खेळलेल्या, माणसांच्या प्रणयक्रीडाकडे ती आता विषन्न नजरेने पहात भिंतीत बंदिस्त असते. आणि एकेकाळी "फट् फट्" धुण्याच्या आवाजाने आसमंत दणाणून सोडणारा नदीचा घाट आता रात्रीच्या अंधारात बाटल्यांच्या काचांचा आवाज घुमवीत राहतो. 

फोटो सौजन्य:mahanewslive

No comments:

Post a Comment