Thursday, July 28, 2016

ग्रामसंस्कृतीतून हद्दपार झालेल्या लोककला



पूर्वी साऱ्या गावाला पहाटे वासुदेवाची स्वारी येवून जागं करायची. डोक्यावर मोर पिसांची टोपी असलेला वासुदेव हातात चिपळ्या आणि टाळ वाजवत गाणी गात गावात शिरायचा. त्याच्या भजन भूपाळ्याचे स्वर गावागातून घुमू लागायचे. याची चाहूल लागताच काही जेष्ठ मंडळी उठून घागरी घेऊन नदीवर पाणी भरायला जायची. चांगला उजेड पडला की वासुदेवाला घरा घरातील लवकर उठलेल्या म्हाताऱ्या आज्ज्या सुपातुन ज्वारी बाजरी वाढायच्या. वासुदेवाचा मान पान केला जायचा. दिवस उगवून वर आला की हे वासुदेव मिळालेली शिदोरी घेऊन गावातून गायब व्हायचे. मग नंदी बैलवाला झूल पांघरलेल्या बैलासाहित गावात हजर व्हायचा. अडल्या नडल्या लोकांची भविष्ये त्याचा  नंदी  मान डूलवून सांगायचा. नंदी शंकराचं वाहन. पण नंदीचा  बैल इतका गरीब कसा काय असू शकतो हा प्रश्न कित्येक लोकांना पडायचा. गावभर हिंडून झालं कि नंदी वेशीतून बाहेर पडायचा. तोपर्यंत एखाद्या गल्लीतून चाबकाचे “फाट फाट” आवाज काढीत कडकलक्ष्मी गावात यायची. तिच्या गाड्यातील देवीला पूजले जायचे. तिला धान्य अथवा ओटी भरून भाकरी तुकडा दिला जायचा.
     
मग कधीतरी दुपारच्या पारी गावच्या वेशीतनं मरतुगंडया घोड्याचा टांगा घेवून डोंबारी त्याच्या समस्त बिराडा सहीत गावात शिरायचा. घोड्याच्या गळ्यातील घंटीच्या आवाजाने भर उन्हाची लहान पोरं त्याच्या मागे मागे धावायची. केसांचा पार चेंदा मेंदा झालेली त्याची चिलिपिली टांग्यात एकमेकांना चिकटून बसलेली असायची. संसाराच्या बोचक्यात बांधलेल्या रंग बिरंगी कोंबड्या भरस्त्यात गचका बसला की वाऱ्यावर डुलायच्या. टांग्याच्या मागे मागे गळ्यात चामड्याचा पट्टा बांधलेला आणि बारा गावचं पाणी प्यालेला त्यांचा कुत्रा शेपूट हलवत मागे मागे धावायचा. गावातली वळु कुत्री त्याच्यावर धावायची. पण हि कुत्री दुसऱ्यांच्या गावात शांत अबोल राह्यची. अंधार पडायला लागला की गावच्या पारासमोर डोंबाऱ्याच्या खेळाचा सेट उभा राह्यचा. तान्हुल्या बाळाला गळ्यात बांधून त्याची धनीण हातात ढोल सदृश्य वाद्ये धरून "बुग्वूss बुग्वूss बुग्वूss” मोठ्याने वाजवायची. वाजणाऱ्या आवाजाने दिवसभर शेतात दमुन् आलेली गडी माणसे जेवणं उरकुन गावाकडे सरकायची.  मोडके खरखर वाजणारे अँलुमिनिअमचे जर्मन सारखे दिसणारे दोन चेपके लाऊड स्पीकर गावाच्या दोन्ही बाजूला लावलेले असायचे. त्याचा स्व:ताच "इलेक्ट्रिकल इंजिनिअर" बनलेला थोरला पोरगा आवाजचं सेटिंग करताना कोपऱ्यात दिसायचा. बारकी बाळी दोरीवरून उड्या मारायची. दोरीवरून चालणारी डोंबारीन बाई म्हणजे लोकांना ती जगातील सर्वात शूर स्त्री वाटायची. रिंगेत शिरायची. कुणी उभ्या आडव्या उडया मारायचं. कुत्रा बारक्या चार पायांचे चंपे एकत्र जमवुन डब्यावर एखांद्या स्थितप्रदण्या सारखा उभा राह्यचा. तिची केस विस्कटलेली आई मगाच्या लेकराला आता गुडग्यात धरून "टान टान " मोठ्याने वाद्ये वाजवायची. वाट्याला आलेल्या कित्येक सुख दु:खांना बाजूला सारत. त्यांचा खेळ बघता बघता बापाच्या खिश्यातून चोरून नेलेली दौलत लहान पोरं या बिऱ्हाडावर उधळायची. मध्यरात्री खेळ संपला कि लोक आप आपल्या घराकडे पांगायचे.

काळ बदलला. खेड्यापाड्यात तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली. घराघरातल्या भिंतीवर एल.सी.डी. टी.व्ही. आले. मोबाईल आले. अशा कार्यक्रमांकडे लोकं फिरकेनाशी झाली. परिणामी वासुदेव, माकडवाला, नंदीबैलवाले, डोंबारी खेड्यातून हळू हळू गायब होत गेले. कुठे लुप्त झाली असतील हि बिऱ्हाडे. खेड्यातून शहराकडे कि आणखी कुठे? एकेकाळी खेड्यातल्या दारो दारी सकाळी फिरणारा नंदी बैलवाला राहिला असेल का अजून जिवंत? गेला असेल का थकुन? चुकून राहिलाच असेल जिवंत तर त्याचा तो व्रतस्थ मान डोलवणारा बैल आणि त्याच्यावरची रुबाबदार बेगड लावलेली शिंगे? काय झालं असेल पुढे त्याचं? की शहरातल्या एखांद्या कत्तलखाण्यात त्याच्या कधी काळी डुलणाऱ्या मानेवर फिरवली गेली असेल सुरी? माणसातल्या हिंस्त्र पशूनी. कुठे हरवली असतील आता ती साऱ्या गावाला रात्रभर उपाशी पोटाने जागून खेळ दाखवणारी डोंबाऱ्याची ती पोरं? आणि रात्रीच्या  अस्पष्ठ अंधारात कर्र कर्र वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमचे सेंटिंग करणारा तो मळकट कपडयातला चिमुकला पोरगा? जगाच्या बाजारात कुठे तरी आता श्वास घेत असेल का?  कधीकाळी पहाटे गावाला जाग आणणारे वासुदेव आता खेड्यात कधीच येत नाही. कुठे हरवले असतील? वार्धक्याने थकले असतील कि झाली असेल त्यांच्या रापलेल्या देहाच्या सापळ्याची माती? निदान कुठल्यातरी स्मशानभुमीत त्यांच्या हाड़काचा एखांदा तुकड़ा राहिला असेल का शिल्लक? पृथ्वीवर अजुन जगण्याची आस शिल्लक ठेवत..…


No comments:

Post a Comment