Monday, January 29, 2018

“मध्यरात्री पेटवलेली प्रेयसी…”

कित्येक वर्षानंतरही तुझ्या आठवणी
बंद खिडक्यांच्या फटीमधून शिरून
भयान रात्री माझ्या मेंदूला
छळू लागल्या तेव्हा मात्र
मी पेटून उठलो...

अखेर तुझ्या आठवणींचा खून करायचा
मी कठोर निर्णय घेतला.
मग तुला कोंबून बसवलेली अडगळीतली
जुनी ट्रंक मी बाहेर काढली
मध्यरात्री सुनसान झालेल्या रस्त्यावर आलो
तर लुटून नेल्यागत शहर गप्पगार पडलेलं...

आकाशाकडे पाहिलं तर
चांदण्यांनी चक्क डोळे ओठारले
पळणाऱ्या झिपऱ्या ढगांना
मला पाहून हसू फुटलं
मी पुन्हा प्रचंड चिडलो...

काठोकाट भरलेली तुझ्या आठवणींची ट्रंक
रस्त्यावर एका क्षणात मी विस्कटून दिली
तू दिलेली प्रेमपत्रं, भेटवस्तू आणि
तुझ्या कवितांचे विखुरलेले कागद
या साऱ्यांची मिळून एक चिता रचली रस्त्यावर.

होळीच्या ढिगात ऊसाचे कांडके उभे करावे
तशी तुझ्या तसबिरीला त्या चितेवर मध्यभागी उभी केली
काडेपेटी काढली आणि त्या मध्यरात्री
मी तुला भर रस्त्यावर धडाधडा पेटवून दिली...

तडातडा जळणाऱ्या तुझ्या चितेची उब घेता-घेता
अर्धवट जळालेल्या कागदाच्या एका तुकड्यावर
नजर येऊन पडली
आणि तेथेच मी अडकलो...
त्यात तू लिहलं होतंस,
"निदान आता जाळलेल्या आठवणींचं श्राद्धतरी
पुन्हा घालू नकोस
नाहीतर आणखी गुंतून जाशील,
आणि नव्याने जळत राहशील

वर्षानुवर्षे....पुन्हा पुन्हा..."

© ज्ञानदेव पोळ


No comments:

Post a Comment