Tuesday, January 31, 2017

अघटीत

गावात एक बाई होती. पोरबाळ नसलेली. बिना ब्रेकची बाई. कुणासोबत तरी हिचं रोज भांडण ठरलेलं. म्हणजे बाईचा तोंडाचा पट्टा एखदा सुरु झाला की कधी बंद होईल हे आख्या गावाला कळायचं नाही. पदर खोचुन गड्यागत बाई घाण घाण शिव्या द्यायची. सणवार बघायची नाही. का सकाळ बघायची नाही. अश्या बाईसमोर नवऱ्याने कधीच हात टेकलेले. नवरा मध्ये पडला की बाई त्याला 'हंडगा' म्हणायची. मग आतली दुखरी बाजू लपवत बिचारा गुड़ग्यात मान घालून बसायचा. समोर येईल तेव्हा खायाचा. अशी ही बाई सहा बैलांचा नांगर शेतात धरायची. रातभर पाळीचं पाणी एकटी ऊसाला धरायची. नवरा कुठं बाहेरगावी गेला तर वस्तीवर गोट्याला एकटी झोपायची. चोरा चिलटाचं भ्या असलं तिला काय न्हवतच. अशी ही केळीच्या कोक्यागत असलेली बाई कशावरून तरी रोज गावात, रानामाळात कोणाशीतरी भांडण उकरून काढायची. बायकांच्या झिंज्या उपसायची. दारावरुन कुत्र, मांजर गेलेलं तिला चालायचं नाही. अशा बाईला मारायला लई जण टपलेली. पण तशी वेळ बाई येवू द्यायचीच नाही...
...अन एका भर दुपारी उन्हाची बाई देशमुखाच्या घरगडया सोबत त्याच्याच ऊसात झोपल्याची बातमी पसरली अन दहा वीस लोकांनी ऊसाला येड़ा टाकला. अन वल्या शेवरीनं नडग्या नडग्या फोडत बाईला बांधावर आणून बाभळीला बांधली. पण बाई काय गड्यासनी पण आटपेना. नुसत्या उसळ्या घ्यायची. इतक्यात नवऱ्यानं बाईच्या पुढं पाला पाचोळा पेटवून जाळ केला. अन लालभड़क वावरातल्या मिरच्या तोडून आणून जाळात टाकल्या. तशी मिरचीच्या धुराचा ठसका लागून बाई शिवारात ठु ठु बोंबलायला लागली. तवापासून आजतागायत बाई गावात कुणाशी भांडली नाही...

फोटो सौजन्य: तरुण भारत

No comments:

Post a Comment