Thursday, December 15, 2016

प्रीती आणि मृत्यूमाधवचं गावाहून अचानकच पत्र आलं. "ताबडतोब निघून ये, मी वाट पाहत आहे". माझा स्वताच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. माधवचं पत्र! आणि तेही तब्बल दहा वर्षानी. इतक्या दिवसानी त्याला माझी आठवण का यावी? तो गावी कधी गेला? पण एवढं मह्त्वाचं काय काम असेल?
मी पटकन बॅग भरली. साडी बदलली. आरशासमोर आले. स्वतला निरखुन पाहिलं. त्याला पूर्वी आवडणारी लाल रंगाची साडी नसले होते. दीपक नुकताच ऑफिसला गेला होता. मुलेही शाळेत गेली होती. दीपकला फोन करुन " मैत्रीण सीरियस आहे गावी जातेय अर्जन्ट!  मुलांना शाळेतून घे" म्हणून सांगितलं. लगबगीने स्टेशनवर आले. कोकणात जाणारी ट्रेन नुकतीच प्लॉटफॉर्मवर येत होती. तिकिट घेतली आणि गाडीत अगदी स्वतला झोकून दिलं. 'खट्ट खट्ट'  आवाज करीत गाडी कोकणच्या दिशेने धावू लागली. मी मात्र विचारात हरवून गेले....
तो आजारी तर नसेल ना?  पत्नीशी भांडण तर झाले नसेल ना? किती वर्षानी आपली भेट होणार! संसाराच्या जीवघेण्या चक्रात आपण अजूनही त्याला का विसरू शकलो नाही.  इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात. पण प्रीतीच्या आठवणींचे रंग...खरच! अखंड उजळत राहतात. प्रसंगी मनुष्य प्रेमात हरेल, पण विसरु शकेल का? किती चीड़ आली होती त्याची त्यावेळी! लग्नास नकार दिला म्हणून. माझ्या लग्नात सुद्धा किती आनंदाने तो वावरत होता. पण मी. छे! किती अस्वस्थ होते त्या दिवशी. किती अश्रु ढाळले असतील त्या रात्री. एकांतातील पहिल्या भेटीची रात्र किती उन्मादक, काव्यमय, इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पुन्हा कधीच उगवणार नसते! दोन नद्यांचे आलिंगन, आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन...छे! किती वर्णने वाचली असतील मी पुस्तकातुन. पण... पण ती रात्र मला एखांद्या हिंस्र पशूने आपल्या भक्षावर गपकन धाड़ टाकावी तशी वाटली.
खरच! दिवस कसे जातात. अगदी वळवाच्या पाऊसासरखे. त्याच्या सहवासातील ते सोनेरी दिवस...एकत्र सागरकिनारी फिरणं, हसणं, बागड़णं, बेधुंद होऊन नाचणं...सायंकाळी समुद्रात बुड़ताना सूर्याला पाहणं... कॉलेजला एकत्र जाणं...एकत्र डिनर... मैत्री...आणि त्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले कळलेसुद्धा नाही...
ते काहीही असो. प्रेम हे टप्प्याटप्प्यानच वाढते. प्रिय व्यक्तीच्या वागन्यातून, बोलन्यातून, सहवासातून, एकमेकांच्या आवडी - निवडीतून, एकमेकांचे दोष झुगारुन विश्वासाने जगन्यातच खरे प्रेम असते हेच खरे!
मग माझं प्रेम स्वच्छ, निर्मळ असुनसुद्धा त्याने का माझा त्याग केला असेल? का मला दूर लोटली असेल. खरच! जवळ येणं किती सोपे असते. पण दूर जाणं किती अवघड गोष्ट असते.
माधवला फुले किती आवडायची. बकुळी, चमेली, मोगरा, पारिजातक, अबोली...किनाऱ्यावर वाळूत फिरताना त्याने वेणीत घातलेली पारिजातकाची फुले मी अजूनही जपून ठेवलीत. त्याची आठवण म्हणून. तोच त्याचा एकमेव स्पर्श होता. क्षितिजापासून धावत किनाऱ्यापर्यंत येवून अंग भिजविणाऱ्या लाटा...मी माझं सर्वस्वच देवून टाकलं होतं...त्याच्या एका चुंबनासाठी मी किती आसुसले होते. पण छे! त्याने कधीच माझं हे स्वप्न पूर्ण केले नाही. त्याच्या प्रेमात वासनेची छटाही कुठे नव्हती. पुरुष बोलून तरी दाखवतात. पण स्त्री...ती कधीच तिला हवी ती गोष्ट बोलून दाखवित नाही. कदाचित दोघांनाही एकाच सुखाची ओढ़ असेल. पण त्याच्या वागण्यात या गोष्ठी कधीच आल्या नाहीत.
खरच! माधव कायमचा जीवनात आला असता तर...तर जगण्याला किती बहार आला असता. किती आनंद निर्माण केला असता त्याने. नाहीतर दीपक...छे! पती असूनसुद्धा मी कधीच त्यांच्याशी एकरूप झाले नाही. त्यांना जीवन म्हणजे नुसत्या शरीराच्या भूका वाटतात. पण... स्त्रीला आणखीही काही हवं असते. हे त्यांना का कळत नाही. त्यांची प्रतिष्ठा, संपती याविषयी आपणास कधीच का आकर्षण वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने केवळ पैसा म्हणजे जीवन-आनंद असेलही. पण छे! नुसत्या पैशावर माणसे जीवनात आनंद निर्माण करू शकतील?
माधवनं असे अचानक का पत्र पाठविले असेल. असे कोणते काम असेल त्याचे. त्याने मला त्याच्या लग्नाचे निमंत्रण सुद्धा पाठविले नाही. लग्नानंतर कधी भेटावयास सुद्धा आला नाही. तरीही किती काळजीने आपण वेड्यासारखे त्याला भेटायला निघालोय. ते काहीही असो, 'जी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी कुठलेही दान देवू शकते तिच खरी स्त्री. अजूनही आठवते त्याची शेवटची भेट...
त्यावेळी माझं एकच मागण होतं. निदान मला एक दिवस तरी तुझी पत्नी कर. माझ फक्त एक चुंबन...पण छे! माझी ही इच्छा त्याने कधीच पूर्ण केली नाही. शेवटी माणूस आशेवर आणि स्वप्नावरच जगतो हेच खरे!
...गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजला. तशी मी तंद्रीतून जागी झाले. माधवच्या भूतकाळीन आठवणीत रमत मी कितीतरी तास हरवून गेले होते. मी खिडकीतून बाहेर पाहिले. गाडीने कोकणच्या निसर्गरम्य जगात प्रवेश केला होता. सगळीकडे नारळ - पोफळीच्या वेड लावणाऱ्या बागा दिसत होत्या. समुद्र तूफानी लाटानी उसळ्या घेत होता. किनाऱ्याच्या मिलनासाठी तो धावत होता. मी ही जणू महानदी बनून कोकणात उतरले होते. जणू सागरालाच मिळायला...
मी स्टेशनवर उतरले. आणि एका पाऊलवाटने चालू लागले. त्या पाऊलवाटा मला माझ्या माधवच्या दिशेने घेवून जात होत्या. बाजुचा हिरवागार पसरलेला निसर्ग, टुमदार घरे, तांबडी माती, उंच डोंगर, आकाशाला गवसणी घालणारी नारळांची झाडे. पाण्यात होडी सोडून दूरवर मासे पकडायला निघालेले कोळी...हे सारं पूर्वीसारखच अगदी ताजेतवानं वाटत होतं. लाल मातीतून चालत-चालत मी ओढ्यातून वर निघाले. चिखलातील कमळे जणू मला बघून हसत होती. त्यांची धनीण त्यांना खूप दिवसांनी दिसत होती. किनाऱ्याच्या काठावर असलेल्या टेकडीवरचे गर्द हिरव्या झाडीतले त्रिकोणी आकाराचे माधवचे कौलारू घर मला स्पष्ट दिसू लागले.
मी दबक्या पावलांनी अंगणात आले. दार उघडेच होते. हळूच आत शिरले. खोलीत किंचितसा अंधार होता. पलिकडे एका कॉटवर माधव निस्तेज पडला होता. झोपल्या अस्वस्थेतच त्याने खिडकी उघडली. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो माधवच होता की दुसरा कोणी? पाण्याविना वठलेल्या झाडासारखा तो हडकुळा मनुष्य बनला होता. त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटली होती. ओठ सुकले होते. गाल आत गेले होते. मी जवळ येताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या हातांना स्पर्श करून मी उठवू लागले. वीज सळसळावी तसे काही रोमांच माझे सर्वांग शहारून गेले. त्याच्या अंगांत किंचित ताप होता. पण तरीही त्याचा स्पर्श... माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... माधव! काय अवस्था केलीस ही?’
त्याने माझ्या डोळ्यात वेड्यासारखे पाहत हास्य केले. पण ते हास्य मला पूर्वीसारखे वाटले नाहीते हास्य मला माझ्या माधवचे वाटले नाही... पूर्वी किनाऱ्यावर फिरताना त्याने केलेले हास्य आज वाटले नाही... त्याच्या सुकलेल्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले...यामिनी तू आलीस, खरच! माझी यामिनी आली. मी... मी स्वप्न तर पहात नाही ना? यामिनी...
इतक्यात एक छानशी, तीन चार वर्षाची लहान गोरी-गोमटी मुलगी माझ्याजवळ आली. मला मिठी मारून बिलगली आणि म्हणाली बाबा माझी आई आली? हीच माझी आई ना?’ माधवन होम्हंटलं. तशी धावतच ती शेजारच्या घरात माझी आई आलीsss’ म्हणत पळत बाहेर निघून गेली. मला आश्चर्यच वाटलं. तिला आपली आईसुद्धा ओळखता येवू नये. पण तिची आई तर मला कुठेच दिसत नव्हती.
सर्व चेहऱ्यावर एकवटून हास्य करीत त्याने माझा हात हातात घेतला. क्षणभर मला काहीच कळेना. माधवला वेड तर लागले नाही ना? मी त्याला प्रतिकार केला. पण... नंतर मी ही त्याच्याकडे ओढले गेले. मी एक संसारी स्त्री आहे हे मी विसरून गेले. मी त्याला घट्ट मिठी मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं... समुद्र्याच्या लाटा जणू किनाऱ्याच्या मिलनासाठी वेगाने धावत होत्या. पानाच्या गर्दीतून जशी नकळत कळी वर यावी तसे त्याने मला त्याच्या बाहूत घेतले. सृष्टीतील सर्व फुलांचा सुगंधच जणू मला मिळाल्याचा भास होत होता. दिपकने लग्नानंतर माझी किती चुंबने घेतली असतील... किती मिठ्या... पण छे! माधवच्या हडकुळ्या झालेल्या शरीराच्या मिठीत जे स्वर्गसुख होते, जी आसक्ती होती, जी आतुरता होती. ती दीपकच्या पोलादी बाहूत मला कधीच मिळाली नव्हती. आज मला विसरायचं होतं, की मला घर, संसार, मुले आहेत. मला विसरायचं होतं, की त्यालाही पत्नी, मुलगी आहे...
पण छे! आकाशाला भेटायला निघालेल्या नारळाच्या उंच झाडाने वादळाबरोबर खाली झावळी सोडून द्यावी तसे त्याने मला क्षणार्धात दूर लोटले. तो निस्तेज, अबोल, डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत कॉटवर पडू लागला. मी त्याला पुन्हा स्पर्श करू लागले... पण तो टेबलाकडे बोट दाखवीत डोळे मिटू लागला. मला काहीच कळेना. मी त्याच्या कपाळावर हात ठेवू लागले. त्याचे शरीर थंड होत चालले होते. हालचाल मंदावत होती. जणू त्याच्या जीवनाची नदी मृत्यूच्या सागराजवळ पोहचली होती. त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... यामिनी... ss.. ज्योती... ss... कदाचित शेवटचेच असावे. होय! शेवटचेच होते ते.....
मी लगबगीने टेबलाकडे पाहिलं. त्याच्यावरती एक फाईल होती. मी उघडली. त्यावेळी मी वेडी कशी झाली नाही हेच मला कळत नाही. त्याच्या रक्तात एच.आय.व्ही.चे विषाणू आले होते. पण कसे? केव्हा? कुठे? आणि तेही माधवसारख्या सुसंस्कृत माणसाच्या शरीरात? फाईल मध्येच मला एक पत्र मिळाले. लिहिलं होतं....
यामिनी,
माझ्यावरील आज विश्वास उडाला ना तुझा? पण वेडे माधवच्या प्रीतीवर विश्वास ठेव. हा माधव शेवटपर्यंत फक्त तुझाच राहिला. माझ्या जीवनात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री तूच आहेस. जीवनात प्रेम पुन्हा पुन्हा येईल, पण प्रीती... फक्त एकदा. हो एकदाच! माणसाला जे हवे असते तेच  त्याच्यापासून खूप दूर जाते यालाच या जगात जीवन म्हणतात’. मला अखंड फक्त तुझच प्रेम हवं होतं. अबोलीच्या फुलासारखं! फुल सुकलं तरी टवटवीत दिसणारं.
पण जीवन हे खरच महाकाव्य असावं! जगातल्या चांगल्या वाईट गोष्टीनी लिहिलेलं. मी लग्नास नकार दिला म्हणून तू त्यावेळी किती चिडलीस. रागवलीस. नाराज झालीस. पण कसं सांगू? ती काळरात्र मला अजूनही आठवते. मला नुकतच कंपनीत प्रमोशन मिळालं होतं. ते माझ्या स्वार्थी मित्रांना पाहवत नव्हतं. त्यांनी या गोष्टीचा फायदा उठविला तो जंगी पार्टी आयोजित करूनच. त्या रात्री मला खूप मद्द्य देण्यात आलं... संगीत ताल धरू लागलं. स्त्री पुरुषांच्या जोड्या बेहोष होऊन नाचू लागल्या. कुणीतरी मुद्दाम आमंत्रित केलेल्या बाजारपेठेतल्या कृत्रीम सौंदर्याच्या नटव्या परुंतु विषारी बाहुल्या माझ्याभोवती फिरू लागल्या... पण मी या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही तेव्हा मात्र मला कसलेतरी इंजेक्शन टोचले गेले... याच्या पुढे मला आजही काहीच आठवत नाही.
यामिनी! मी लग्नच केलेलं नाही. माझं लग्न झालय असं मी तुला पत्रातून सांगितलं. त्याबद्दल क्षमा कर. ज्योती माझी मुलगी नाही! या जगात व्यभिचारातून जन्मलेल्या आणि ज्यांना आपले आईबाप कोण आहेत हे माहित नसणाऱ्या निष्पाप कोवळ्या कळीसारखीच या पृथ्वीतळावर जन्माला आलेली एक अनाथ कळी आहे ती. पण... त्या कळीवर मी खूप प्रेम केलय. माझ्या जगण्याचा आधार होती ती. माझी वात्सल्याची भूक मी शांत केलीय.
शेवटी, ज्योती आजपासून तुझी मुलगी असेल. फक्त तुझी... तुझे संस्कार तिच्यावर कर. तिला शिक्षण दे. तिचं बालमन जेव्हा जेव्हा मला विचारे, ‘बाबा माझी आई कुठाय?’ तेव्हा-तेव्हा मी तिला तुझा फोटो दाखवत असे. आणि हीच तुझी आई खूप दूर आहे, पण एक दिवस नक्की येईल. तुला माझ्यापासून दूर घेवून जायला.असे सांगून कशीतरी तिची समजूत काढत असे. माझ्या मृत्यूपत्रानुसार सर्व इस्टेट ज्योतीची आणि तुझी असेल. माझ्या हातून कागदावर उतरलेली ही अक्षरे शेवटची असतील.
यीमिनी, तुझ्या डोळ्यात पाणी... वेडे तुला अजून जगायचंय... माझ्या!!! छे! आपल्या ज्योतीसाठी...
                                                            ----- माधव. 
मी माधवकडे पाहिलं. तो निष्पर्ण चमेलीसारखा पडला होता...
राम नाम सत्य आहेच्या घोषात माधव अखेरच्या प्रवासासाठी स्मशानाकडे गेला. मी चिमुकल्या ज्योतीला घेवून स्टेशनच्या दिशेने चालू लागले. आईss, बाबा कुठायेत? ते का येत नाहीत आपल्या सोबत?’ तिचं बालमन मला विचारू लागलं. माझे डोळे भरून आले. शारीरिक प्रेमाच्या सुखाच्या पलीकडेही प्रीती असू शकते हे आज मला कळून चुकले होते. मी सहज क्षितिजाकडे पाहिलं. सूर्याचा लाल गोळा समुद्रात बुडत होता. एकेकाळी हवासा वाटणारा तो क्षण आज नकोसा वाटत होता. आज त्यात मला माझ्या माधवच्या अग्नीच्या लाल ज्वाला दिसत होत्या...
ज्योतीचा चिमुकला हात हातात घेवून मी कुठे चालले होते? मला माझा संसार होता. घरदार होते. मुलेबाळे होती. खरच! ज्योतीचा माझ्या घरात स्वीकार होणार होता का? माझ्या घरात तिला माझ्या मुलाइतकेच हक्काचं स्थान मिळणार होतं का? आज मला यातलं काहीच माहित नव्हतं. माझ्या दृष्टीने या जगात फक्त दोनच गोष्टी खऱ्या होत्या.... प्रीती आणि मृत्यू”.
1 comment:

  1. अतिशय सुंदर... आणि तितकेच सत्यही...
    या जगातील अनेक दुःखाचे मूळ (न मिळालेले) प्रेमच आहे (असे मला वाटते).
    असंख्य जण एकमेकांच्या प्रेमात आहेत पण एकमेकांचे नाहीत..
    आणि जे एकमेकांचे आहेत ते प्रेमात नाहीत...

    ReplyDelete